Sunetra Pawar to Meet Vidip Jadhav's Family : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधीनंतर पहिल्याच दौऱ्यासाठी निघण्याचे ठरवले आहे. त्या सातारा जिल्ह्यात जाऊन दिवंगत कॉन्स्टेबल विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. विदीप जाधव दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक होते आणि त्यांचाही अजितदादांसोबत विमान अपघातात मृत्यू झाला होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शपथविधीनंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे. त्या येत्या दोन दिवसांत सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या केवळ राजकीय औपचारिकता न पाळता, वैयक्तिक नात्यांनाही तितकेच महत्त्व देताना दिसणार आहेत. या संवेदनशील दौऱ्याचा सविस्तर जाणून घेऊ..
अजितदादांच्या 'सावली'ला अखेरचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती विमान अपघातात त्यांचे अंगरक्षक (PSO) विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे रहिवासी होते. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले जाधव हे वर्षानुवर्षे सावलीसारखे अजितदादांच्या सोबत असायचे. 29 जानेवारी 2026 रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी आमदार रोहित पवार यांनी जाधव कुटुंबाची भेट घेतली होती, मात्र आता स्वतः सुनेत्रा पवार त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणार आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut: "दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार", संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन
सातारा दौऱ्याची सुरुवात सुनेत्रा पवार कराड येथील 'प्रीतिसंगम'वरून करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला (कराड) भेट देऊन त्या त्यांना अभिवादन करतील. राजकीय कारकिर्दीची नवी आणि मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट
31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक अत्यंत भावूक पोस्ट केली. "आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला आणि वंचितांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याकडे सध्या क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून कौतुक
सुनेत्रा पवार यांच्या या धाडसी निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आहे. कठीण प्रसंगातही महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारणे कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुनेत्रा पवार अजितदादांचे स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - CM Devendra Fadanvis : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक, अट घालून केली राष्ट्रवादीची पंचाईत