Devgad Hapus: कोकणचा अभिमान मानला जाणारा देवगड हापूस आंबा यंदा हंगामाच्या अगदी सुरुवातीला बाजारात दाखल झाला असून, पहिल्याच पेटीने विक्रमी भाव मिळवत नवा इतिहास रचला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली. या पेटीत एकूण सहा डझन आंबे होते. या पहिल्या लिलावात ती पेटी 25 हजार रुपयांना विकली गेली.
मागील वर्षी दिवाळीच्या काळात हापूसच्या पहिल्या पेटीला 20 हजार ते 22 हजार इतका दर मिळत होता, मात्र यंदा तो आकडा ओलांडत देवगड हापूसने पुन्हा एकदा आपली किमया दाखवली आहे. देवगड तालुक्यातील पडवणे गावातील बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ही पहिली पेटी तयार केली. जुलै महिन्यात त्यांच्या बागेतील काही कलमांना लवकर मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवर त्यांनी प्लास्टिक कवच घालून विशेष संरक्षण दिलं. योग्य देखभाल, फवारणी आणि काळजीमुळे त्या झाडांवर सुमारे सहा पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली.
हेही वाचा - Pressure Cooker Recipes: प्रेशर कुकर फक्त भातासाठी नाही! घरच्या घरी बेकरी आणि हॉटेलसारखे पदार्थ झटपट तयार करा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हापूसची विक्री
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलाल मार्फत या पेटीची लिलाव प्रक्रिया करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या पेटीची विक्री झाल्याने यंदा आंबा बाजारात 'दिवाळी हापूस' म्हणून एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मते, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंब्याची पहिली पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा - Kitchen Secrets: साधं जेवणही रेस्टॉरंटसारखं चविष्ट कसं लागतं? स्वयंपाकघरातील ‘या’ मसाल्यांमध्ये दडलंय गुपित
हापूसप्रेमींसाठी आनंदाची बातमी
या पहिल्या विक्रीनंतर हापूसप्रेमी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहजपणे उन्हाळ्याशी जोडला जाणारा देवगड हापूस आता दिवाळीतच बाजारात दिसू लागल्याने 'ऑक्टोबर हापूस' ही संकल्पनाही लोकप्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.