Diwali Dhantrayodashi 2025 : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या काळात लोक सुख, समृद्धी आणि रोगमुक्तीसाठी मंदिरांमध्ये विशेष पूजा करतात. आपल्या वेगवेगळ्या मान्यतेमुळे ओळखली जाणारी देशात अनेक मंदिरे आहेत. वाराणसीत असलेले महामृत्युंजय महादेव मंदिर हे असेच एक खास ठिकाण आहे, जिथे भाविक रोगांपासून मुक्ती मिळावी या इच्छेने येतात.
या मंदिरातील विहिरीचे पाणी खूपच चमत्कारी मानले जाते. या पाण्याचे केवळ स्पर्श केल्यानेही अनेक आजार बरे होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. या मंदिराची कथा औषधींचे देवता मानले जाणाऱ्या भगवान धन्वंतरींशी जोडलेली आहे. याच कारणामुळे, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर येथे भक्त विशेष पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
धन्वंतरींचा आशीर्वाद आणि चमत्कारी पाणी
वाराणसीतील महामृत्युंजय महादेव मंदिरात येणारे भक्त अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवतात, अशी येथील मान्यता आहे. या मंदिराला मृत्यूवर विजय मिळवण्याचे स्थान देखील म्हटले जाते. मंदिरात असलेल्या या चमत्कारी विहिरीच्या पाण्यामध्ये भगवान धन्वंतरींचे औषध आणि आशीर्वाद आहे, ज्यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते. भाविकांच्या मते, समुद्रमंथनानंतर भगवान धन्वंतरींनी आपली औषधी याच विहिरीत टाकली होती, त्यामुळे हे पाणी चमत्कारी बनले.
हेही वाचा - Diwali 2025: भारतातील 'या' ठिकाणी दिवाळी का साजरी केली जात नाही?, जाणून घेऊया त्यामागील श्रद्धा काय?
विषबाधेपासून वाचण्यासाठी धन्वंतरी महादेवाच्या आश्रयाला
मंदिराशी जोडलेली आणखी एक कथा लोकांमध्ये प्रचलित आहे. असे मानले जाते की, एकदा तक्षक नागाने भगवान धन्वंतरींना दंश केला होता. या जहराच्या (विष) प्रकोपातून वाचण्यासाठी धन्वंतरींनी भगवान महादेवाच्या चरणी आश्रय घेतला आणि याच विहिरीच्या पाण्याने स्वतःचे प्राण वाचवले. या दरम्यान त्यांनी सामान्य लोकांच्या मदतीसाठी या विहिरीमध्ये अनेक आरोग्यवर्धक औषधी सोडून दिल्या. त्यामुळे भक्त रोगातून मुक्ती मिळवण्यासाठी या विहिरीचे पाणी पितात आणि दूरवरून आलेले भाविक आपल्या कुटुंबीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे पाणी आपल्यासोबत घेऊन जातात.
विहिरीचे पाणी कधीही आटत नाही
मंदिराशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, या विहिरीतील पाणी कधीही आटत नाही. तसेच हे पाणी शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचे काम करते. उत्तर प्रदेश पर्यटन विभाग देखील या मंदिरातील माती आणि पाण्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे मान्य करतो. या मंदिरात भगवान शिवाचे शिवलिंग स्थापित आहे. येथे महादेवाची पूजा केल्याने मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते, अशीही श्रद्धा आहे. श्रावण आणि दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात खास पूजा-अर्चेचे आयोजन केले जाते आणि भक्तांची मोठी गर्दी जमते.
हेही वाचा - Dhantrayodashi 2025 : समुद्र मंथन आणि भगवान धन्वंतरी यांच्याशी जोडलेले आहे धनत्रयोदशीचे रहस्य, जाणून घ्या पौराणिक कथा