Gold Buying Tips: भारतात सोन्याचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व दोन्ही आहे. परंपरेनुसार लोकांनी दागिन्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करून साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता काळ बदलला असून गुंतवणुकीच्या नव्या स्वरूपामुळे डिजिटल सोन्याची लोकप्रियता वाढत आहे. लॉकरची गरज नाही, सुरक्षितता वाढली आहे. तसेच सध्या गुंतवणूक अधिक लवचिक झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता डिजिटल सोन्याकडे वळत आहेत.
डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचे फायदे
डिजिटल सोने हे पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून खरेदी करता येते. पेटीएम, गुगल पे, फोनपे यांसारख्या अॅप्सद्वारे तुम्ही केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही गुंतवणूक 24 कॅरेट शुद्ध सोन्यात केली जाते आणि ती सुरक्षित तिजोरीत साठवली जाते. याचा मुख्य फायदा म्हणजे चोरी, साठवणूक किंवा शुद्धतेची चिंता नसते. तुम्ही कधीही विक्री करू शकता आणि गरज पडल्यास ती रक्कम सहजपणे रोखीत रूपांतरित करू शकता. त्यामुळे अल्प गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय अधिक व्यवहार्य ठरतो.
हेही वाचा - Atal Pension Yojana : 1 ऑक्टोबरपासून नवा नियम; जाणून घ्या नवीन फॉर्ममध्ये कोणती माहिती आवश्यक
पारंपारिक सोन्याचे फायदे
दुसरीकडे, भौतिक सोन्याला (Physical Gold) अजूनही स्वतःची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. ते केवळ गुंतवणूक नसून एक वारसा आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. भौतिक सोने दागिन्यांच्या स्वरूपात परिधान करता येते आणि गरज पडल्यास कर्जासाठी तारण म्हणूनही वापरले जाऊ शकते. बाजारभाव वाढल्यावर ते विकून नफा मिळवता येतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेकांना अजूनही पारंपारिक सोने अधिक स्थिर आणि विश्वासार्ह वाटते.
हेही वाचा -Zoho: झोहोचा पेमेंट हार्डवेअरसह साउंडबॉक्स लाँच, GPay, Paytm आणि PhonePe ला टक्कर देण्यासाठी सज्ज
जर तुम्हाला सुरक्षित आणि लवचिक गुंतवणूक हवी असेल, तर डिजिटल सोने योग्य पर्याय आहे. परंतु जर तुम्ही भावनिक आणि पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देता, तर भौतिक सोने अधिक आकर्षक ठरते. एकूणच, गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि वापराची गरज यानुसारच कोणते सोने तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, हे ठरवणे योग्य राहील.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)