छत्रपती संभाजीनगर : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. तरी देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अजून अटक झालेली नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख, आमदार सुरेश धस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित होते. जनआक्रोश मोर्चात बीडचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर जोरदार हल्लाबोल केला. धस यांनी वाल्मिक कराडवर बोलताना त्याच्या मालमत्तेविषयी सांगितले. तसेच आकाला फासावर चढताना बघायचे असल्याचेही त्यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संतोष देशमुख आणि सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे. तसेच देशमुख आणि सुर्यवंशीसोबत चुकीचे घडले असे आमदार धस यांनी म्हटले आहे. परळीत इराणी समाजाच्या लोकांकडून वेगवेगळे उद्योग सुरू आहेत. परळीत सीआयडी मालिकेतील पोलिस नेमणूक करा असे पत्र पोलिसांना देणार असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा
'आका इतने करोड़ लेकर तू कहां जाएगा?'
पैठण येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार धस यांनी प्रश्नांची मालिका सुरू केली आहे. आका इतने करोड़ लेकर तू कहा जाएगा? असा प्रश्न भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा असे गाणे मी ऐकले होते. मग एवढे पैसे कशासाठी कमावयचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाच हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी असली तरी मेल्यानंतर साडेतीन फुटच जागा मिळते आणि गरिबांना देखील तेवढीच जागा मिळते. मग एवढी कमवायची आवश्यकता काय? हा पैसा कुठे घेऊन जायचा होता? असा प्रश्न धस यांनी उपस्थित केला. आपण कशासाठी आणि कोणासाठी मोर्चा काढतोय, याचे भान ठेवा, असे आवाहन देखील त्यांनी केले. तुम्हाला मोर्चा काढायचे असतील तर काढा, तुमच्या नेत्यांची बाजू घ्या, मात्र तुम्हाला संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी आणि भावाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही का? असा प्रश्न धस यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनतेमधील राग आणि रोष आरोपींना फाशी मिळेपर्यंत कायम टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
'वाल्मिक कराडची प्रॉपर्टी दीड हजार कोटींहून जास्त'
वाल्मिक कराड यांची केवळ पुण्यातील प्रॉपर्टी 100 कोटींच्या पुढे जात आहे. त्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे असल्याचे धस यांनी म्हटले आहे. विविध गावात त्यांची प्रॉपर्टी ही दीड हजार कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचे धस यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि मकोका लावला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. देशमुख हत्या प्रकरणात खऱ्या मास्टरमाईंडला अजून 302 प्रकरण लागलेले नाही. यामध्ये आकाला 302 लावला पाहिजे असे देखील धस यांनी सांगितले.
'राष्ट्रवादीमधील मुन्नी एक पुरुष'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्या मुन्नीचा उल्लेख मी करत आहे. ती महिला नसून ती पुरुष असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. मी ज्या मुन्नीचा उल्लेख करत आहे, त्या मुलीला 100 टक्के कळाले आहे. मात्र ती अद्याप बाहेर आलेली नाही. मुन्नी आधीच बदनाम झालेले आहे. ती मुन्नी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी मी याविषयी बोलेल, असे धस यांनी म्हटले आहे. मुन्नीचे सर्व लफडे माझ्याकडे आहेत. मात्र त्या मुन्नीला आधी बोलू द्या, असे देखील धस यांनी म्हटले आहे.