सोमनाथ : सोमनाथ मंदिर न्यास अर्थात सोमनाथ ट्रस्टकडून चौदा जिल्ह्यात गरजूंना वस्त्र प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दहा हजार 600 वस्त्रांचे वस्त्र प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. याआधी 22 जिल्ह्यांमध्ये सात हजार 748 वस्त्रांचे आणि चौदा हजार 915 प्रसादाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
कार्तिक महिन्यातील शिवरात्रीनिमित्त गुजरातमधील बनासकांठा, साबरकांठा, अरवल्ली, महिसागर, पंचमहल, दाहोद, छोटा उदयपुर, नर्मदा, भरूच, सूरत, नवसारी, वलसाड, तापी, डांग या जिल्ह्यांमध्ये वस्त्र प्रसादाचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि न्यासाचे प्रशासन यांनी परस्पर समन्वय राखून वस्त्र प्रसादाचे गरजूंना वितरण केले. वितरण प्रक्रिया सुरू असताना न्यासाच्या मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले.
वस्त्र प्रसाद आणि महाप्रसाद वाटपाचे काम सुरू असताना त्यावर न्यासाचे विश्वस्त जे.डी. परमार, योगेंद्र देसाई, मुख्य प्रशासक अजय दुबे लक्ष ठेवून होते. विश्वस्त पी.के. लहरी आणि विश्व जागृती मिशनचे संस्थापक कथा वाचक सुधांशु महाराज हे ऑनलाईन पद्धतीने वितरणावर लक्ष ठेवत होते. वस्त्र प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्यांना विश्व जागृती मिशनचे संस्थापक कथा वाचक सुधांशु महाराज यांनी आशीर्वाद दिले.
सुधांशु महाराजांनी सोमनाथ मंदिर न्यासाच्या वस्त्र प्रसाद आणि महाप्रसादाच्या वितरण व्यवस्थेचे कौतुक केले. या कार्यात आणखी सक्रीय होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने सोमनाथ न्यास अतिशय उत्तम काम करत असल्याचे सुधांशु महाराज म्हणाले.
सोमनाथ मंदिराचा इतिहास
सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर ज्याला देव पाटण असेही म्हणतात. हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण, वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले समजले जाते. अनेकदा मुसलमान आक्रमकांनी हे मंदिर फोडले. पण प्रत्येकवेळी मंदिराची पुनर्बांधणी झाली. मंदिर आक्रमकांनी नेमके किती वेळा फोडले आणि मंदिराची नेमकी किती वेळा पुनर्बांधणी झाली याबाबत इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकदा सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली. भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार हे काम करण्यात आले. मंदिराचे काम 1951 मध्ये पूर्ण झाले पण त्यावेळी मंदिर बघण्यासाठी वल्लभभाई नव्हते. सध्या सोमनाथ मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे. हे अहमदाबादच्या नैऋत्येस सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आणि पोरबंदर विमानतळाच्या आग्नेयेस सुमारे 130 किलोमीटरवर तर दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे 85 किलोमीटरवर आहे. सोमनाथ मंदिर वेरावळच्या प्राचीन व्यापारी बंदराजवळ आहे. या बंदरातून अकराव्या शतकापर्यंत पूर्व आफ्रिका आणि चीनमध्ये व्यापारी जहाजांची ये - जा होती.