छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश केल्यानं चांगलीच खळबळ माजली. यासंबंधीत एक व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्यभरातून या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. भुमरे यांनी मुलाला केवळ मतदान यंत्राजवळ नेले नाही, तर तेथील कर्मचाऱ्याकडून मुलाच्या बोटाला शाईदेखील लावून घेतली. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले असून केंद्राध्यक्षांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : Zilla Parishad Election 2026: लोकशाहीची थट्टा? कुठे आमदारानं लहान मुलाकडून दाबून घेतले EVM चे बटण, तर कुठे पालकांसोबत मुलगा मतदान केंद्रात
याप्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आमदार भुमरे यांच्या मुलाने बोटाला शाई लावून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. बातम्या मधूनच मी ही घडलेली घटना पाहिली. त्यावेळी फुलंब्री तालुक्यातील मतदान केंद्रांना मी भेटी देत होतो. पैठणचे निवडणूक अधिकारी फुलारी त्यांना मी सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची झोनल ऑफिसरकडून संपूर्ण सखोल चौकशी करून यातील वस्तुस्थितीचा अहवाल त्यांनी सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच तेथील जे कोणी कर्मचारी यात सहभागी असतील. त्या सर्वांची पूर्णपणे माहिती घेऊन सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मतदान प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे यात जास्त ढवळाढवळ आम्ही करत नाहीत. परंतु जे कोणी आपले अधिकारी यात दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई आम्ही करू, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे.