मुंबई: लग्न म्हटलं की आनंद साजरा करतातच मात्र एखाद्या घटस्फोटाचे मोठे सेलिब्रेशन केल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल. पण हो, हे खरं आहे. एका तरुणाने घटस्फोटानंतर त्याचं सेलिब्रेशन केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या आईकडून दूधाने स्नान करताना दिसत आहे आणि त्यानंतर 'सुखी घटस्फोट' असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो.
तरुणाचे घटस्फोट सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या तरुणाचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हजारो लोकांनी त्याच्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या कृतीवर टीका केली आहे. तर काहींनी युवकाच्या नव्या दृष्टीकोनाचे स्वागत केले आहे. व्हिडीओत युवकाची आई त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक करत आहे. हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर युवक 'सुखी घटस्फोट' असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसतमुखाने तो केक कापतो. मी माझ्या माजी पत्नीला 120 ग्रॅम सोने आणि 18 लाख रुपये दिले आहेत असे त्याने केकवर लिहिले होते. तसेच कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. 120 ग्रॅम सोने आणि 18 लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम! असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! दिवाळीत खात्यात येणार थेट 3000 रुपये
या व्हिडीओला आलेल्या प्रतिक्रियेनंतर तरुणाने पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करत समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओवर वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी त्याने घटस्फोटानंतरही आयुष्य नव्या पद्धतीने कसं पाहता येऊ शकतं याबाबत एक वेगळा दृष्टीकोन पुढे आणला आहे.