Thursday, November 13, 2025 08:30:43 AM

Diwali Padwa 2025 : बलिप्रतिपदा म्हणजे काय? जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि महत्त्व

बलिप्रतिपदा म्हणजे केवळ सण नाही, तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. हा वर्षातील महत्त्वाच्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

diwali padwa 2025  बलिप्रतिपदा म्हणजे काय जाणून घ्या शुभ मुहूर्त पौराणिक कथा आणि महत्त्व

Diwali Padwa : लक्ष्मीपूजनानंतर लगेच साजरा होणारा महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा, ज्याला सर्वसामान्यपणे दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे त्याला अतिशय शुभ मानले जाते. हा केवळ आनंद आणि उत्साहाचा उत्सव नसून, त्यामागे अनेक पौराणिक आख्यायिका आणि समृद्ध परंपरा दडलेल्या आहेत.

अश्विन महिन्यातील अमावस्येनंतर लक्ष्मीपूजन झाल्यावर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरी होते. हा दिवस सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीचे औक्षण (ओवाळणे), आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ अशा अनेक कारणांसाठी खास मानला जातो. या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीराजाची प्रतिमा काढून तिची पूजा करण्याची प्रथा आहे आणि "इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना केली जाते. यावर्षी, 22 ऑक्टोबर 2025 रोजी बलिप्रतिपदा साजरी केली जाईल.

बलिप्रतिपदेचे शुभ मुहूर्त
बलिप्रतिपदा साजरी करण्यासाठी यावर्षी तीन शुभ मुहूर्त आहेत:
पहिला शुभ मुहूर्त: सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत.
दुसरा शुभ मुहूर्त: सकाळी 10:56 वाजल्यापासून ते दुपारी 12:23 वाजेपर्यंत.
तिसरा शुभ मुहूर्त: संध्याकाळी 4:24 वाजल्यापासून ते 6:09 वाजेपर्यंत.

हेही वाचा - PM Modi Diwali Wishes: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा; प्रकाश, आत्मनिर्भरता आणि सौहार्दाचा संदेश

बलिप्रतिपदेची पौराणिक कथा
बलिप्रतिपदा म्हणजे केवळ सण नाही, तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. या दिवसाला ‘द्युत प्रतिपदा’ असेही म्हटले जाते, कारण या दिवशी पार्वतीने महादेवांना द्युत खेळात हरवले होते, असे सांगितले जाते. बलिप्रतिपदेचा मुख्य नायक म्हणजे असुरांचा राजा बळी. बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही तो चारित्र्यवान होता आणि नेहमी प्रजेचे हित पाहणारा होता, तसेच तो भगवान महाविष्णूंचा निस्सीम भक्त असून दानशूरपणासाठीही प्रसिद्ध होता.

बळीराजाच्या वाढत्या सामर्थ्यामुळे जेव्हा देवसत्तेचा प्रश्न निर्माण झाला. याच सुमारास बळी राजाने एक यज्ञ केला आणि त्यानंतर दान देण्यास सुरावत केली. याच यज्ञाच्या वेळी भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून बटूवेशात बळीराजासमोर उभे राहून तीन पाऊले भूमी मागितली. बळीराजाने वचन दिल्यामुळे ते दान दिले. त्यावेळी वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करून स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि वामनाने त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळ लोकांचे राज्य दिले. बळीराजाला  गर्व झाला होता, हे जाणून भगवान महाविष्णूंनी त्याच्या डोक्यावर स्वतःचे पाऊल ठेवून त्याचा अहंकार त्याचे अधःपतन टाळण्याच्या उद्देशाने नष्ट केला. शिवाय, त्याने सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवान महाविष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याच्या सत्यवचनी आणि दानशूरपणामुळे त्याला वरदान मिळाले की, कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक त्याची पूजा करतील. त्यामुळेच या दिवशी लोक आनंद व्यक्त करण्यासाठी दीपोत्सव साजरा करतात.

हेही वाचा - Diabetic Dessert Ideas:दिवाळीत गोड खाण्याची चिंता? मधुमेहींसाठी स्वादिष्ट आणि सुरक्षित 'हे' 5 पर्याय

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आणि पौराणिक आख्यायिकेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री