Tuesday, February 17, 2026 07:47:16 AM

Dombivli News : "परप्रांतीयांना अभय आणि मलाच त्रास का?" 'त्या' मराठी तरुणीचे केडीएमसीवर गंभीर आरोप

एकताने केलेल्या दाव्यानुसार, जेव्हा तिच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी वाढू लागली, तेव्हापासून स्थानिक परप्रांतीय दुकानदार आणि काही रिक्षावाल्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

dombivli news  quotपरप्रांतीयांना अभय आणि मलाच त्रास काquot त्या मराठी तरुणीचे केडीएमसीवर गंभीर आरोप

Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात गेल्या 2 वर्षांपासून खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवणाऱ्या एकता भास्कर सावंत या तरुणीला भीषण मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकताने एका व्हिडिओच्या माध्यमातून तिची कैफियत मांडली असून, तिने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) दुटप्पी भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. घरात ती एकटीच कमावती असतानाही तिचा धंदा तब्बल 20 दिवस बंद पाडण्यात आला. "मी हात जोडले, विनवण्या केल्या, पण कोणालाही माझी दया आली नाही," असे ती रडत रडत सांगत होती. विशेष म्हणजे, दिवाळी आणि नवरात्रीसारख्या सणांच्या काळातही तिला व्यवसाय करू दिला गेला नाही.

परप्रांतीयांचा दबाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप
एकताने केलेल्या दाव्यानुसार, जेव्हा तिच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी वाढू लागली, तेव्हापासून स्थानिक परप्रांतीय दुकानदार आणि काही रिक्षावाल्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. "परप्रांतीयांनी तक्रार केली आणि कारवाई मराठी माणसावर झाली," असा आरोप तिने केला. 200 ते 300 रिक्षावाल्यांनी तिला घेरून धमकी दिली, तर केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी "तुझी गाडी तोडून टाकू" अशी भाषा वापरली. इतर विक्रेते गॅस सिलिंडर वापरतात, पण केवळ तिच्याच सिलिंडरवर आक्षेप घेऊन तिला तिथून हटवण्यात आले. पावती फाडून अधिकृतपणे व्यवसाय करण्याची तिची तयारी असतानाही प्रशासनाने तिला नकार दिला.

राजकीय उदासीनता आणि नैराश्य
आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी एकताने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयातही फेऱ्या मारल्या, मात्र तिला तिथे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. "मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले होते, माझ्या पायावर चाकू पडला तरी मी उभी राहून धंदा करण्याचा प्रयत्न केला," असे तिने सांगितले. वॉर्ड ऑफिसरने तिला रेल्वे स्टेशनपासून 150 मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास मनाई केली, मात्र तिच्याच बाजूला असलेल्या इतर अमराठी शोरमा आणि फ्रँकी विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे तिने निदर्शनास आणून दिले. या पक्षपातीपणामुळे तिचा संताप अनावर झाला आहे.

हेही वाचा - Hingoli : 'सर, माझं लग्न थांबवा...!', दहावीत शिकणाऱ्या मुलीचं शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र, पुढे जे झालं ते वाचून थक्क व्हाल

मनसेचा खंबीर पाठिंबा
या अन्यायाची माहिती मिळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी एकताची भेट घेतली आणि तिला खंबीर पाठिंबा दिला. "मराठी माणसाने स्वतःच्या भूमीत रडण्याचे कारण नाही," असे म्हणत त्यांनी तिला तिथेच टपरी टाकण्याचा सल्ला दिला. मनसेच्या हस्तक्षेपामुळे एकताला आता नवा धीर मिळाला आहे. जर कोणाही अधिकारी किंवा परप्रांतीयाने तिला पुन्हा त्रास दिला, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज ठाकरेंचा फोटो असलेल्या स्टॉलला कोणीही हात लावण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास तिला देण्यात आला आहे.

मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
एकता सावंतचा हा लढा केवळ एका तरुणीचा नसून, तो मुंबई-ठाणे परिसरातील मराठी तरुणांच्या रोजगाराच्या संघर्षाचे प्रतीक बनला आहे. "गुजराती लोकांना माझ्या चिकनचा वास येतो, मग ते मुंबईत पैसे कमवायला येतातच कशाला?" असा परखड सवाल तिने विचारला. मराठी माणसाने उभ्या केलेल्या उद्योगांना पाठी खेचण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत, अशी मागणी तिने केली आहे. या प्रकरणावरून आता डोंबिवलीत 'मराठी विरुद्ध परप्रांतीय' असा वाद पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. केडीएमसी यावर आता काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - "बिहारच्या मंत्र्यांनी आधी स्वतःचे राज्य सुधारावे" बिहार भवनावरून मनसेचा कडाडून विरोध, अविनाश अभ्यंकरांचा हल्लाबोल


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या