Thursday, February 12, 2026 06:37:46 PM

Avinash Jadhav : डोंबिवलीत 'मराठी कार्ड' जोरात! तरुण उद्योजिकेला मज्जाव केल्याने मनसे आक्रमक; अविनाश जाधवांचा थेट इशारा

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत धडक देताच रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांची मोठी पळापळ झाली. 150 मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही अनेक परप्रांतीय फेरीवाले..

avinash jadhav  डोंबिवलीत मराठी कार्ड जोरात तरुण उद्योजिकेला मज्जाव केल्याने मनसे आक्रमक अविनाश जाधवांचा थेट इशारा

MNS Avinash Jadhav at Dombivli Station : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, यावेळी एका मराठी तरुणीला व्यवसाय करण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तरुणी या परिसरात खाद्यपदार्थांची (शावरमा) गाडी चालवते. मात्र, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिसांकडून तिला वारंवार कारवाईचा त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला. दिवसाला 300 रुपयांपर्यंत दंड किंवा हप्ता भरूनही केवळ आपल्यावरच कारवाई का होते, असा संतप्त सवाल या तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून विचारला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी याची दखल घेत अविनाश जाधव यांना तातडीने तिथे पाठवले.

फेरीवाल्यांची पळापळ आणि मनसेची धडक
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत धडक देताच रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांची मोठी पळापळ झाली. 150 मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही अनेक परप्रांतीय फेरीवाले तिथे ठाण मांडून बसतात, मात्र प्रशासन केवळ मराठी माणसाला लक्ष्य करते, असा आरोप मनसेकडून करण्यात आला. अविनाश जाधव यांनी प्रत्यक्ष त्या तरुणीची भेट घेतली आणि तिच्या व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले. "मराठी माणसाने रडायचे नाही, तर नडायचे असते," अशा शब्दांत त्यांनी त्या मुलीला धीर दिला.

प्रशासकीय ढिसाळपणावर ताशेरे
यावेळी संबंधित तरुणीने पालिका अधिकाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "निवडणूक काळ संपल्यानंतर अधिकारी जेसीबी (JCB) घेऊन कारवाईची भीती दाखवतात, पण प्रत्यक्षात रस्ते फेरीवाल्यांनीच भरलेले असतात," असे तिने सांगितले. मधुबन गल्लीतील दुकानांच्या बाहेर लावलेल्या अनधिकृत शेडमुळे व्यवसायाला जागा मिळत नसल्याची तक्रारही तिने केली. यावर अविनाश जाधव यांनी पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरशी आणि आयुक्तांशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य काढण्याचे आश्वासन दिले. कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान न करता मराठी उद्योजकाला जागा मिळवून देणे, हा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Rashmi Thackeray : राज ठाकरेंचे शब्द ऐकून रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर, पाहा भावनिक क्षणाचा व्हिडीओ

अविनाश जाधवांचा आक्रमक पवित्रा
अविनाश जाधव यांनी स्थानिक मनसे शहर अध्यक्षांना आणि त्यांच्या टीमला कडक सूचना दिल्या आहेत की, या तरुणीच्या व्यवसायाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहता कामा नये. "मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असेल, तर त्याला सहकार्य करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे," असे ते म्हणाले. यापुढे जर तिला विनाकारण त्रास दिला, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला. 30 ते 40 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या इतर फेरीवाल्यांना अभय दिले जाते आणि नवीन सुरू होणाऱ्या मराठी व्यवसायावर गदा आणली जाते, हे सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मराठी अस्मितेचा पुन्हा एल्गार
या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येऊन ठेपले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या तरुणीला पाठिंबा दर्शवला. "तुला रडणारा व्हिडिओ करायची गरज नाही, आमची पूर्ण टीम तुझ्या पाठीशी उभी आहे," असे आश्वासन जाधव यांनी दिले. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून फेरीवाला धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी मनसेने केली आहे. या प्रकरणामुळे आता डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला काय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Mumbai Local Trains: मेल-एक्सप्रेसला 'रेड कार्पेट' आणि लोकल प्रवाशांना 'वेळकाढूपणा'; प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळाली उडवाउडवीची उत्तरं, काय घडलंय नेमकं?


सम्बन्धित सामग्री