मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्याची मागणी भीम आर्मीने पुन्हा जोरदारपणे उचलून धरली आहे. या मागणीसाठी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आज दादर स्थानकाबाहेर आंदोलन केले. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, मात्र त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले, भीम आर्मी गेल्या दहा वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. त्यांनी उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात आले असताना दादर स्थानकाचे नामकरण का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला.
भीम आर्मीने दादर स्थानकाच्या नामांतरासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वी जर हा निर्णय झाला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन केले जाईल असा इशाराच आंदोलनावेळी देण्यात आला.
हे आंदोलन फक्त स्थानिक पातळीपुरते मर्यादित राहणार नसून देशभर पसरवले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. भीम आर्मीच्या मागणीमुळे दादर स्थानकाचे नामकरण हा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.