Saturday, March 07, 2026 04:37:25 AM

Nashik News : नाशिककरांची कोंडी फुटणार! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता 'दहा पदरी' होणार; कुठून कुठे जातो हा मार्ग?

नाशिकमधील सर्वात वर्दळीचा मानला जाणारा द्वारका चौक ते नाशिकरोड हा सुमारे 8 किलोमीटर लांबीचा रस्ता आता 'दहा पदरी' करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांचा प्रवासही सुखकर होईल.

nashik news  नाशिककरांची कोंडी फुटणार द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता दहा पदरी होणार कुठून कुठे जातो हा मार्ग

Dwarka Circle-Nashik Road : नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहराचा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून, नाशिकमधील सर्वात वर्दळीचा मानला जाणारा द्वारका चौक ते नाशिकरोड हा सुमारे 8 किलोमीटर लांबीचा रस्ता आता 'दहा पदरी' करण्यास मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे द्वारका परिसरातील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी कायमची निकालात निघण्याची शक्यता आहे.

276 कोटींचा सुधारित प्रस्ताव आणि मंजुरी
द्वारका ते नाशिकरोड या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नाशिक महानगरपालिकेने 276 कोटी रुपयांचा प्रस्ताव 'न्हाई'कडे सादर केला होता. या प्रस्तावावर दिल्लीत सोमवारी, 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये काही तांत्रिक फेरबदलांच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने मंगळवारी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सुधारित आराखडा सादर केला. या नव्या प्रस्तावावर 'न्हाई'कडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून, लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या दहा पदरी रस्त्यासोबतच द्वारका चौकात 800 मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) देखील मंजूर करण्यात आला आहे. रुंदीकरणामुळे रस्त्याची क्षमता दुप्पट होणार असून, स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांचा प्रवासही सुखकर होईल.

हेही वाचा - Shaktipeeth Mahamarg : 'शक्तिपीठ महामार्गा'बाबत मोठी अपडेट; नव्या आराखड्यात 'या' 16 गावांच्या समावेशाची शक्यता

प्रमुख महामार्गांना जोडणारा दुवा
द्वारका चौक हे नाशिकमधील सर्वात मोठे 'जंक्शन' आहे, जिथे मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे हे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग एकत्र येतात. हा नवीन दहा पदरी रस्ता पुणे, शिर्डी आणि सिन्नरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः मुंबईहून नाशिकमार्गे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. दहा पदरी विस्तारामुळे वाहनांची गती वाढेल आणि इंधनासह वेळेचीही बचत होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येतात. त्या काळात द्वारका चौकात होणारी गर्दी हाताळणे हे मोठे आव्हान असते. मात्र, या नव्या निर्णयामुळे येत्या काळात हे काम काहीसे सोपे होऊ शकते.

सिंहस्थासाठी पायाभूत सुविधांचा वेग; डबलडेकर पूल आणि मेट्रो प्रकल्पांना 'ब्रेक'
या नव्या निर्णयामुळे नाशिकमध्ये प्रस्तावित असलेला 'डबलडेकर उड्डाणपूल' आणि त्यावर धावणारी 'निओ मेट्रो' हे प्रकल्प आता बासनात गुंडाळले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी द्वारका ते नाशिकरोड दरम्यान उड्डाणपुलावर मेट्रो धावणार होती, परंतु सिंहस्थासाठी तातडीची गरज म्हणून रस्ता रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या तुलनेत दहा पदरी रस्ता हा अधिक व्यवहार्य आणि जलद पर्याय असल्याचे प्रशासनाचे मत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Rajmata Jijau Buses : एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ' बस; पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा


सम्बन्धित सामग्री