EPFO Rules Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अलीकडेच त्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे देशभरातील कोट्यवधी पीएफ खातेधारकांवर परिणाम होणार आहे. पीएफ क्लेम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, डिजिटल पडताळणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि यूएएन सक्रिय करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमांचे उद्दिष्ट 'जीवन सुलभता' आणि 'व्यवसाय सुलभता' सुनिश्चित करणे आहे.
फेस व्हेरिफिकेशनद्वारे मिळणार UAN आणि सेवांचा लाभ -
ईपीएफओने फेस व्हेरिफिकेशनवर आधारित नवीन डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत, ज्या अंतर्गत आता ग्राहक फेस व्हेरिफिकेशनद्वारे त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मिळवू आणि सक्रिय करू शकतात. या सेवा सुरू करताना केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, यामुळे डिजिटल माध्यमातून वापरकर्त्यांना सोप्या आणि जलद सेवा मिळतील.
हेही वाचा - EPFO Passbook: झटपट पीएफ बॅलन्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा 'या' 5 पद्धती
उमंग अॅपद्वारे UAN सक्रिय करता येणार -
दरम्यान, आता कर्मचारी 'उमंग' मोबाईल अॅपच्या मदतीने आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) वापरून UAN तयार करू शकतात. उमंग अॅपद्वारे नियोक्ते नवीन कर्मचाऱ्यांसाठी UAN देखील जनरेट करू शकतात. ज्या सदस्यांकडे आधीच UAN आहे पण ते सक्रिय केलेले नाही ते देखील या अॅपच्या मदतीने सहजपणे UAN सक्रिय करू शकतात.
हेही वाचा - ATM in Train: आता प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये मिळणार एटीएम सुविधा!
चेकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही -
ईपीएफओने पीएफ दाव्यांची प्रक्रिया सोपी केली आहे. आता पीएफ क्लेम करताना रद्द केलेल्या चेकचा फोटो किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करणे बंधनकारक नाही. तसेच, बँक खाते पडताळणीसाठी आता नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही. या बदलांमुळे, पीएफशी संबंधित सेवा जलद, सोप्या आणि पारदर्शक झाल्या आहेत. ईपीएफओचे हे पाऊल डिजिटलायझेशनच्या दिशेने एक मोठी सुधारणा मानली जात आहे, ज्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही दिलासा मिळेल.