Sunday, February 09, 2025 04:15:45 PM

Shaktipeeth highway
शक्तिपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदील

राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन-उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शक्तिपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदील

मुंबई : राज्यातील शक्तिपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन-उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले आहेत. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, असं म्हटलंय.  त्यामुळे या महामार्गावरून महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध का?

शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा असेल.  हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून पत्रादेवी, गोवा येथे संपणार आहे.  हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे. माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई, कोल्हापूरची महालक्ष्मी या मंदिरांना हा महामार्ग जोडणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या महामार्गाला तीव्र विरोध आहे. महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती असल्यानं जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भूसंपादनासाठी अडचण होती. या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका व्यक्त केला जातोय. कोल्हापूरमधील सर्व पक्षांनी शक्तिपीठाला विरोध केला होता. किसान सभेने नागपूर ते कोल्हापूर असा राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गासाठी भूसंपादन न करण्याचा सरकारचा निर्णय होता. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी महामार्गाचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. 

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून विरोध झाला आहे. तेथील शेतकऱ्यांना भूमिहिन होण्याची भीती आहे.

हेही वाचा : वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी; केज कोर्टाने काय निर्णय दिला?

 

शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर हसन मुश्रीफ यांनी आपण निवडणुकांपूर्वी लोकांना शब्द दिला होता याची आठवण करून दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना समजावून त्यांचे कोणतेही नुकसान न करता या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास दिला आहे. या मार्गाचे रेखांकन बदललं गेलं नाही तर शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीत घटक पक्ष आपापली 'शक्ती' दाखवण्याची शक्यता आहे. 
 


सम्बन्धित सामग्री