हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून, त्यासाठी जिल्ह्याने 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदविली होती. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही रक्कम रखडली होती. आता आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे. या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे शेतजमिनी खरडून गेल्या. उभे पीक वाहून गेले. जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडविला होता. या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगामच बाधित झाला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे केले. जिल्ह्यात 2 लाख 95 हजार 171 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने जिल्ह्याने 419 कोटी 48 लाख 21 हजार 306 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली होती. मात्र निधीची पूर्तता होण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्ह्याची मदत रखडली होती. आता आचारसंहिता शिथिल झाली असून येत्या काही दिवसांत नवीन सरकार सत्तेवर येईल. त्यामुळे जिल्ह्याचे रखडलेले 419 कोटी रुपये केव्हा मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतिक्षा
हिंगोलीत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी 419 कोटींची मागणी सरकारला केली होती. मात्र त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या होत्या. निवडणुकांमुळे शेतकऱ्यांची मागणी रखडली होती. आता राज्यातील निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आली आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी शेतकरी राजा 419 कोटींच्या प्रतिक्षेत आहे.