Goregaon Fire News : मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका गगनचुंबी इमारतीला आज सकाळी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बहुतेक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळच्या सुमारास अग्नितांडव
आज शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.11 वाजता गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील 'डीबी वूड्स' (DB Woods) या 45 मजली टोलेजंग इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. कृष्ण वाटिका रोडवर असलेल्या या इमारतीच्या 9 व्या मजल्यावरील एका बेडरूममधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही वेळातच ही आग पसरू लागल्याने संपूर्ण इमारतीत घबराट पसरली आणि रहिवाशांची सुरक्षिततेसाठी धावपळ सुरू झाली.
हेही वाचा - Heavy Vehicle Ban: मुंबईकरांनो लक्ष द्या! दादरचा टिळक पूल जड वाहनांसाठी 3 महिने बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग
बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची मोठी यंत्रणा
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने 9.25 वाजता या आगीला 'लेव्हल-1' घोषित केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी खालील बचाव साहित्य तैनात करण्यात आले:
वाहने: 4 फायर इंजिन, 4 जंबो टँकर आणि 1 अॅडव्हान्स वॉटर टँकर.
विशेष यंत्रणा आणि मदतकार्य : उंचावर पोहोचण्यासाठी टर्न टेबल लॅडर (TTL) आणि हाय प्रेशर पंपाचा वापर करण्यात आला. मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले.
रहिवाशांची सुरक्षित स्थळी रवानगी
इमारत मोठी असल्याने धूर वेगाने वरच्या मजल्यांवर पसरण्याची शक्यता होती. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील अंतर्गत अग्निशमन यंत्रणा (Fixed Firefighting System) कार्यान्वित करण्यात आली. रहिवाशांना सुरक्षितपणे 'रिफ्यूज एरिया' आणि इमारतीच्या टेरेसवर हलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्येक मजल्याची पाहणी करून कोणी अडकले नाही ना, याची खात्री केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - Road Accident News: महामार्गावर मृत्यूचे तांडव; कार, ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक, एकाच वेळी सात जणांनी गमावला जीव