Chandra Grahan 2026 Today : वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज, मंगळवार 3 मार्च 2026 रोजी होत आहे. हे 'ग्रस्तोदित' प्रकारचे चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतात दिसणार असल्याने खगोलप्रेमी आणि ज्योतिषप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी या ग्रहणाची सुरुवात होणार असून, ग्रहणामुळे धार्मिक नियमांनुसार सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासूनच सूतक काळ (वेध) सुरू झाला आहे.
चंद्रग्रहणाची वेळ आणि महाराष्ट्रातील स्थिती
भारतीय मानक वेळेनुसार, हे चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल आणि त्याची समाप्ती (मोक्ष) संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी होईल. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात चंद्रोदय साधारणपणे संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास होईल. जेव्हा चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल, म्हणूनच याला 'ग्रस्तोदित चंद्रग्रहण' म्हटले जाते. महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या 20 ते 22 मिनिटांसाठी हे विलोभनीय दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहता येईल.
सूतक काळ आणि पाळावयाचे नियम
चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून सूतक लागल्याने मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. या काळात देवदर्शन, मूर्तीला स्पर्श करणे किंवा कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूतक काळात आणि ग्रहण काळात ईश्वराचे नामस्मरण करणे अत्यंत फलदायी ठरते.
हेही वाचा - Blood Moon Perfect Photo : फोटोग्राफर्सहो तयार राहा! 'या' वेळेत क्लिक करा सुंदर 'ब्लड मून'चे फोटो
दिवसभरात टाळाव्यात अशा 5 चुका
सूतक आणि ग्रहण काळात आरोग्यावर आणि मनावर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो:
अन्न ग्रहण : आजारी व्यक्ती, वृद्ध आणि लहान मुले वगळता निरोगी व्यक्तींनी सूतक काळात जेवण करणे टाळावे.
झोपणे : ग्रहणाच्या काळात झोपणे अशुभ मानले जाते, त्याऐवजी नामस्मरण करावे.
स्वयंपाक : सूतक काळात नवीन अन्न शिजवू नये. पाणी किंवा दुधाचे सेवन देखील टाळण्याचा सल्ला दिला जातो.
स्नान : ग्रहण काळात स्नान करू नये, असे मानले जाते. ग्रहण सुटल्यानंतरच शुद्ध स्नान करावे.
शुभ कार्य : गृहप्रवेश किंवा लग्नाशी संबंधित चर्चा यांसारखी महत्त्वाची कामे आज दिवसभर टाळावीत.
खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे, कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरून चंद्रोदयाच्या वेळी तांबूस किंवा लालसर रंगाचा चंद्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनंतर घराची स्वच्छता करून, पुन्हा एकदा अंघोळ करून मगच ताजे अन्न ग्रहण करावे, असा शास्त्राचा संकेत आहे.
हेही वाचा - Holi 2026 : होळीपौर्णिमेला श्री साईसच्चरित्रातील 40 वा अध्याय मनोभावे वाचण्याने जीवनात अवतरते बाबांची कृपा; मिळते अचिंत्य फळ
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)