Toxic Work Culture : कामाच्या ठिकाणी बॉसकडून होणाऱ्या छळाला आणि फसवणुकीला कंटाळून एका 28 वर्षीय महिलेने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने ऑफिसमध्येच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीमध्ये ऑफिसमधील सर्वजण बाहेर गेलेले असताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या 5 महिन्यांपासून पगार न मिळणे आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन झालेली फसवणूक, या दुहेरी संकटामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या बॉसला अटक केली आहे. आशी गौतम असे मृत तरुणीचे नाव असून ती मागील 4 वर्षांपासून या रियल इस्टेट ब्रोकरकडे काम करत होती. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली.
लग्नाचे आमिष आणि पुन्हा पुन्हा फसवणूक
धीरज कुमार नावाच्या रिअल इस्टेट ब्रोकरकडे मृत आशी गौतम ऑफिस सेक्रेटरी आणि अकाउंटंट म्हणून काम करत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, धीरजने तिला लग्नाचे स्वप्न दाखवले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, धीरज हा आधीच विवाहित होता. त्याला एक मुलगा असल्याची बाब त्याने आशीपासून लपवून ठेवली होती. काही महिन्यांपूर्वी जेव्हा आशीला हे सत्य समजले, तेव्हाही त्याने आपण पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशीच लग्न करू, असे खोटे आश्वासन दिले. आशी त्याच्या बोलण्याला फसून पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकली.
आर्थिक अडचणी आणि 5 महिन्यांचा थकीत पगार
आशी ही आपल्या 3 जणांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. ती भाड्याच्या घरात राहायची आणि तिने काही कर्जही घेतले होते. मात्र, आरोपी धीरजने तिला मागील 5 महिन्यांपासून वेतन दिले नव्हते. पगार न मिळाल्यामुळे तिच्यावर कर्जाचे हप्ते (EMI) भरण्यासाठी प्रचंड दबाव होता. पगारासाठी तिने वारंवार मागणी करूनही धीरजने तिला दाद दिली नाही, उलट तिला आणि तिच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा - Crime News : पत्नी विवाहानंतर दोनच महिन्यांत प्रियकरासोबत पळाली; धक्क्याने पतीने संपवले जीवन, लग्न जुळवणाऱ्यानेही कवटाळला मृत्यू
ऑफिसमध्येच संपवले आयुष्य
28 जानेवारी 2026 रोजी जेव्हा ऑफिसमधील इतर कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेले होते, तेव्हा आशीने 'केशव कॉम्प्लेक्स'मधील कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी जेव्हा धीरज ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याने स्वतः पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. आशीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीनुसार, धीरजने तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळले होते, ज्यामुळे ती नैराश्यात गेली होती.
आरोपी बॉसला बेड्या
अंकुर विहारचे एसीपी ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान धीरजने मान्य केले की तो आधीच विवाहित असल्याने आशीशी लग्न करू शकत नव्हता. मात्र, तिला पगार न देणे आणि लग्नाच्या नावाखाली तिची फसवणूक करणे हे तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. पोलिसांनी धीरज कुमारला भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत अटक केली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आशीची आई लखनऊला नातेवाईकांकडे गेली असताना ही घटना घडली. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या लेकीने अशा प्रकारे मृत्यूला कवटाळल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - Female Commando Death: 'कॉल रेकॉर्ड कर, मी तुझ्या बहिणीला...'; गर्भवती कमांडो पत्नीला पतीकडून अमानुष मारहाण, मेव्हण्याला लाईव्ह दाखवतं क्रूरकृत्य