Friday, March 13, 2026 07:58:32 AM

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायचंय? वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात वाहतुकीत मोठे फेरबदल; 'हे' आहेत नवीन मार्ग

महाशिवरात्रीनिमित्त 6 दिवस मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. त्यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

mahashivratri 2026 महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायचंय वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात वाहतुकीत मोठे फेरबदल हे आहेत नवीन मार्ग

Mahashivratri 2026 : छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात (Ghrishneshwar Mahadev Temple) महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक हजेरी लावतात. या काळात भाविकांची होणारी गर्दी आणि धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी विशेष आदेश जारी करून 14 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वाहतुकीसाठी तात्पुरते मार्गबदल लागू केले आहेत. खुलताबाद आणि वेरूळ परिसरातील ही व्यवस्था भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कन्नड, वेरूळ आणि खुलताबाद मार्गावर महत्त्वाचे डायव्हर्शन दिले आहे. आता कन्नडकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा आणि शरनापूर फाटा या मार्गाचा अवलंब करावा लागेल. तसेच, शहराकडून कन्नडकडे जाणाऱ्या वाहनांनाही याच मार्गाने विरुद्ध दिशेला वळवण्यात आले आहे. यामुळे घृष्णेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरील ताण कमी होईल आणि भाविकांना शांततेत दर्शन घेणे शक्य होईल.

हेही वाचा - Bhimashankar Jyotirlinga Temple: यंदाच्या महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले राहणार? समोर आली मोठी अपडेट

अवजड वाहने आणि इतर मार्गांची व्यवस्था
केवळ मुख्य महामार्गच नाही, तर फुलंब्री आणि सुलतानपूर मार्गे कन्नडकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या काळात महामार्गावरील अवजड वाहतुकीवरही काही प्रमाणात निर्बंध राहण्याची शक्यता असून वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे आवाहन
या 6 दिवसांच्या कालावधीत मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. त्यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेतही दिले आहेत. तुम्ही जर या काळात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल, तर या नवीन वाहतूक आराखड्याचे पालन करणे तुमच्या प्रवासासाठी सोयीचे ठरेल.

हेही वाचा - Mahashivratri 2026 : कोकणवासीयांना महाशिवरात्रीला गावी जाणं झालं सोपं; 6 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा, पाहा पूर्ण वेळापत्रक


सम्बन्धित सामग्री