Sunday, February 08, 2026 07:40:57 AM

Nashik Municipal Election : तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावर घेतला 'रामा'चा आश्रय; गिरीश महाजन म्हणाले, अयोध्येच्या धर्तीवर भव्य मंदिर उभारणार

तपोवनात साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या 1825 झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणप्रेमी आणि 'तपोवन वाचवा' चळवळीतील आंदोलकांनी भाजपला लक्ष्य केले होते, त्याला उत्तर देण्यासाठी..

nashik municipal election  तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावर घेतला रामाचा आश्रय गिरीश महाजन म्हणाले अयोध्येच्या धर्तीवर भव्य मंदिर उभारणार

Ram Mandir in Tapovan : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला असताना, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. सिडकोतील पवननगर मैदानावर आयोजित भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना महाजन यांनी तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारण्याची घोषणा केली. तपोवनात साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या 1825 झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणप्रेमी आणि 'तपोवन वाचवा' चळवळीतील आंदोलकांनी भाजपला लक्ष्य केले होते, त्याला उत्तर देण्यासाठी महाजन यांनी हा 'अध्यात्मिक' मार्ग निवडल्याचे दिसत आहे.

विकास आणि कुंभमेळ्याचे 30 हजार कोटींचे नियोजन
आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 30,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी आवर्जून सांगितले. नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढील 25 ते 30 वर्षांतील लोकसंख्येचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक परिक्रमा मार्ग, अद्ययावत पाणीपुरवठा योजना आणि सिमेंटच्या रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांनी शहरात 15,000 ते 20,000 नवीन झाडे लावण्याचे आश्वासनही दिले.

सिडकोतील राजकीय बंडाळी आणि हकालपट्टी
सिडको भागात भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी आणि 'एबी' अर्जांचा गोंधळ या सभेत प्रकर्षाने जाणवला. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत माजी नगरसेविका अलका अहिरे, पदाधिकारी कैलास अहिरे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या भागात भाजपचे अधिकृत उमेदवार असतानाही काही नेत्यांनी अपक्ष किंवा तांत्रिक गोंधळामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला सिडकोत अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. याच गोंधळामुळे सिडकोतील सभेला आमदार सीमा हिरे यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा - Mumbai-Ahmedabad Bullet Train: 7 बोगद्यांचे जाळे अन् 18 महिन्यांचा संघर्ष...राज्यातील 'या' शहरातून जाणार बुलेट ट्रेनचा मार्ग

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी भाजपचाच महापौर हवा
गिरीश महाजन यांनी भाषणादरम्यान 2015 च्या कुंभमेळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. "मी त्यावेळी पालकमंत्री होतो आणि यावेळी नसलो तरी काही बिघडत नाही, पण कामे थांबणार नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कुंभमेळ्याचे भव्य आयोजन यशस्वी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत भाजपचाच महापौर असणे गरजेचे असल्याचे त्यांनी मतदारांना पटवून दिले. सिडकोतील त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल, भूमिगत वीज तारा आणि गटार योजनेसाठी विशेष तरतूद करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. ठाकरे बंधूंनीही आपल्या सभांमधून वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून महाजन यांना घेरले होते. या पार्श्वभूमीवर, केवळ विकासकामेच नाही तर 'राम मंदिर' उभारण्याची घोषणा करून महाजन यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे. आता 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात नाशिककर वृक्षतोडीच्या पर्यावरणाच्या मुद्द्याला प्राधान्य देतात की राम मंदिराच्या घोषणेला, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा - BMC Election Cash Seized: नालासोपाऱ्यात मतदानापूर्वीच 'लक्ष्मी दर्शन'? पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री जप्त केली रोकड, काय आणि कसं घडलं?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या