Gold-Silver Prices Fall : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भाववाढीने लग्नाचा बस्ता बांधणाऱ्या सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, मात्र आता हा दरवाढीचा फुगवटा फुटल्याने खरेदीदारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील मंदी आणि डॉलरचा वाढलेला जोर यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींनी सपशेल लोटांगण घातले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचे पडसाद आता सराफा बाजारात उमटू लागले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सराफा बाजारात मोठी पडझड; सोन्याचे आजचे दर (Gold-Silver Latest Rates in Mumbai, Pune, Delhi)
भारतीय कुटुंबांसाठी सोनं ही केवळ गुंतवणूक नसून एक भरवसा असतो, मात्र अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. 2 फेब्रुवारी 2026 च्या सकाळी सोन्याचे दर 1,60,000 रुपयांच्या आसपास स्थिरावल्याचे दिसत आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,60,720 रुपये असून 22 कॅरेटसाठी 1,47,340 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोने 1,60,570 रुपये तर 22 कॅरेट सोने 1,47,190 रुपयांवर आले आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याने 1,85,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता, मात्र आता त्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
सराफा बाजारात सध्याच्या या मोठ्या पडझडीनंतर एक प्रकारचे 'वेट अँड वॉच' धोरण पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमतींनी घेतलेली ही विश्रांती गुंतवणूकदारांना संभ्रमात टाकणारी आहे. ही दरातील घसरण म्हणजे खरेदीची सुवर्णसंधी आहे की किमती अजून खाली जाणार, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.
चांदीच्या दरात लाखाची घसरण
सोन्यापेक्षाही चांदीच्या दरात झालेली घसरण अधिक धक्कादायक आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत चांदीचे दर तब्बल 1,00,000 रुपयांनी कोसळले आहेत. 30 जानेवारी 2026 रोजी चांदीचा भाव 4,00,000 रुपयांच्या पुढे गेला होता, मात्र अवघ्या 48 तासांत यात 50,000 रुपयांहून अधिकची थेट घट पाहायला मिळाली. चांदीचे दर एका टप्प्यावर 4,20,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते, तिथून आता मोठी नफा वसुली (Profit Booking) झाल्याने दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा भाव 95.26 डॉलरवर आल्याने भारतीय बाजारात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
हेही वाचा - Budget 2026 : मुंबईत एव्हीजीसी हब, बुलेट ट्रेन, एमएसएमई क्षेत्राला चालना..., केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?
ऐतिहासिक वाढीनंतरची ही केवळ 'दुरुस्ती' (Correction)?
सोन्या-चांदीच्या दरात अलीकडेच 1980 नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. भारतात सोन्याचे दर 1.80 लाख रुपयांच्या उच्चांकावरून घसरून 1.49 लाखांपर्यंत खाली आले, तर चांदी 4.20 लाखांवरून थेट 2.91 लाखांपर्यंत कोसळली. जागतिक बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 4,864 डॉलर आणि चांदी 84.66 डॉलरवर आली. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण म्हणजे किमती कोसळण्याचे संकेत नसून, सातत्याने झालेल्या वाढीनंतरची ही एक सामान्य तांत्रिक 'दुरुस्ती' (Correction) आहे.
घसरणीमागील मुख्य कारणे
या दरवाढीला ब्रेक लागण्यामागे जागतिक आणि स्थानिक अशी दोन्ही कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव 5,087 डॉलर प्रति औंस इतका खाली आला आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी 'सोव्हरिन गोल्ड बाँड' (SGB) वरील कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलत दिल्याने 'फिजिकल' सोन्याच्या किमतीवरील दबाव वाढला आहे. अमेरिकन डॉलर वधारल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिला. या कारणाने सोन्या-चांदीचे भाव सध्या घसरणीच्या मार्गावर आहेत. यामुळे ज्यांच्या घरात लग्नसराई आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, दर आणखी वाढतील या अपेक्षेने उच्च दरात गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर एकाच वेळी सर्व पैसे गुंतवण्यापेक्षा, अशा घसरणीच्या काळात छोट्या-छोट्या प्रमाणात खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. अल्पकालीन व्यापार किंवा खरेदी-विक्री करणाऱ्यांनी (Short-term traders) मात्र सावधगिरी बाळगावी; कारण बाजारात नजिकच्या काळात अजूनही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. ग्राहकांची मागणी कायम असल्याने किमती पुन्हा एकदा भरारी घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हेही वाचा - Budget 2026 : खरेदीदारांचा हिरमोड! वाहन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा नाहीत; आता गाड्या स्वस्त होणार की महाग?