Tuesday, March 17, 2026 02:35:29 PM

Abhishek Sharma: टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; खेळण्याबाबतचा सस्पेन्स कायम

गुरुवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ही बातमी आल्याने संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तथापि, त्याच्या प्रत्यक्ष मैदानावरील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

abhishek sharma टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज खेळण्याबाबतचा सस्पेन्स कायम

Abhishek Sharma Fitness Update: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा अलीकडेच आजारी पडल्यामुळे संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ही बातमी आल्याने संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तथापि, त्याच्या प्रत्यक्ष मैदानावरील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

पोटात संसर्ग झाल्याने होते रुग्णालयात दाखल; टिळक वर्माने दिली माहिती
भारतीय संघ T20 विश्वचषक 2026 मध्ये गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी, भारतीय फलंदाज टिळक वर्मा याने माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. टिळक वर्माने सांगितले की, "अभिषेक शर्माला आज, बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पोटात संसर्ग (Stomach Infection) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते." तो आता संघात परतला असला, तरी तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, हे सामन्याच्या दिवशी परिस्थिती पाहून ठरवले जाईल.

नामिबिया विरुद्ध लढत आणि हाय-व्होल्टेज भारत-पाक सामन्याची उत्सुकता
भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबियाविरुद्ध दोन हात करेल आणि त्यानंतर संघ कोलंबोला रवाना होईल. तिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे. या महामुकाबल्याबद्दल बोलताना टिळक वर्मा म्हणाला की, "संपूर्ण संघ या सामन्यासाठी अत्यंत उत्सुक असून आम्ही त्यासाठी आधीच तयारी केली आहे. पाकिस्तानी संघ खेळण्यास सज्ज असल्याची बातमी मिळाल्यापासून आमच्यात उत्साहाचे वातावरण आहे."

हेही वाचा - IND vs PAK T20 Match: "भारताला 4 गुजराती चालवतात.." पाकिस्तानच्या 'यू-टर्न'नंतर शाहिद आफ्रिदीने गरळ ओकली; म्हणाला,"त्यातले दोघे.."

अभिषेक शर्माचा 'एक्स-फॅक्टर' ठरणार निर्णायक?
अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने टीम इंडियाच्या विजयात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सलामीला येऊन तो विरोधी संघावर दबाव निर्माण करण्यात माहीर आहे. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील पहिल्या सामन्यात तो 0 धावांवर बाद झाला होता, ज्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने झुंजार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. आता नामिबिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी कर्णधार सूर्या अभिषेकच्या सहभागाबाबत काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री