Wednesday, February 18, 2026 09:20:48 AM

Hydrogen Balloons Blast : 'काळ आला होता पण..' लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा भीषण स्फोट

एक तरुण हायड्रोजन गॅस भरलेले अनेक फुगे घेऊन लिफ्टमध्ये आला. त्याच्यासह आणखी दोघे लिफ्टमध्ये होते. तेवढ्यात काही कळण्याच्या आतच सर्व फुग्यांचे आगीच्या लोळात रूपांतर झाले.

hydrogen balloons blast  काळ आला होता पण लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा भीषण स्फोट

Hydrogen Balloons Blast : मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने हातात धरलेल्या फुग्यांचा अचानक स्फोट झाला, ज्यामुळे लिफ्टमध्ये असलेल्या प्रवाशांच्या जिवावर बेतले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती,' असाच अनुभव संबंधितांना आला.

लिफ्टमधील तो भयंकर प्रकार
गोरेगाव पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली. एक तरुण हायड्रोजन गॅस भरलेले अनेक फुगे घेऊन लिफ्टमध्ये आला. त्या वेळी लिफ्टमध्ये एक तरुणी आधीपासूनच होती आणि अन्य एक व्यक्ती फुगे घेऊन येणाऱ्याच्या पाठोपाठ आत आली. लिफ्टचा दरवाजा बंद होण्याआधीच अचानक या फुग्यांचा मोठा स्फोट झाला. काही सेकंदातच लिफ्टमध्ये धूर आणि आगीचा लोळ पसरला. पण सुदैवाने लिफ्टचा दरवाजा बंद झाला नसल्याने तिघेही तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि जीवितहानी टळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व थरार कैद झाला असून, स्फोट इतका जबरदस्त होता की लिफ्टमधील सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.

हेही वाचा - Pune Mumbai Road Traffic : प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ST च्या सर्व फेऱ्या रद्द; एक्सप्रेस-वेवर अपघातानंतर 22 तासांनंतरही कोंडी कायम!

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
हायड्रोजन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने अशा स्फोटात मोठी आग लागण्याची शक्यता असते. मात्र, या घटनेत स्फोट होऊनही मोठी आग लागली नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. स्फोटानंतर काही क्षणातच लिफ्टचे दरवाजे उघडले आणि सर्वांनी बाहेर धाव घेतली. या घटनेमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हायड्रोजन फुग्यांच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

हायड्रोजन फुगे : आनंदाच्या क्षणी साक्षात मृत्यूचा धोका?
सण-समारंभ किंवा वाढदिवसाच्या सजावटीसाठी हायड्रोजन फुग्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, हे फुगे किती धोकादायक असू शकतात, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. लिफ्टसारख्या बंदिस्त जागेत गॅस गळती किंवा घर्षणामुळे स्फोट होण्याची शक्यता अधिक असते. हायड्रोजन वायू अत्यंत ज्वालाग्राही असल्याने ही आग पटकन लागते आणि भीषण रूप घेऊ शकते. अगदी सामान्य तापमानालाही हा वायू पेट घेतो. शिवाय, आग लागल्यास आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन हानी अधिक होण्याची शक्यता असते. यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी आपल्या मुलांसाठी किंवा सजावटीसाठी गॅस फुगे वापरताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून आणि तज्ज्ञांकडून नेहमीच करण्यात येते.

हेही वाचा - Mumbai Belasis Flyover: विक्रमी वेळेत काम पूर्ण करूनही मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल का आहे बंद? धक्कादायक कारण समोर


सम्बन्धित सामग्री