भेंडा : राज्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात शिवीगाळ करण्यास बंदी करणारा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामसभेने केलेल्या ठरावानुसार गावात शिवी देणाऱ्यास 500 रुपयांचा दंड केला जाईल. सरपंच शरद आरगडे यांनी ही माहिती दिली.
अनेकजण आई किंवा बहिणीवरुन शिव्या देतात. महिलांचा काहीही संबंध नसताना नाहक त्यांचा अपमान केला जातो. हा प्रकार बंद करण्यासाठी आणि महिलांचा सन्मान राखण्यासाठी शिव्यांवर बंदी घालणारा ठराव ग्रामसभेने केला. गणेश आरगडे यांनी ग्रामसभेत शिव्यांवर बंदी घालणाऱ्या ठरावाला अनुमोदन दिले.
शाळेत शिकत असलेल्या मुलांना गावात संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत मोबाईल, सोशल मीडिया वापरता येणार नाही, असाही ठराव ग्रामसभेने केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले. ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे, उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आडागळे, कावेरी आढागळे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिव्यांवर बंदी घालणारा आणि मोबाईल तसेच सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालणारा ठराव ग्रामसभेने मंजूर केला. ग्रामसभेने बालकामगार बंदी आणि बालविवाह बंदी असेही ठराव मंजूर केले आहेत.