Gunratna Sadavarte PC, Raj Thackeray Controversy : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील राजकीय नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका ट्विटचा समाचार घेताना सदावर्ते यांनी अत्यंत तीव्र शब्द वापरले. "काँग्रेसच्या पोटात आग लागली तर लागली, पण राज ठाकरेंना का... ?" असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. यादरम्यान राज ठाकरेंविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली. 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'ला विरोध करणाऱ्या शक्तींना त्यांनी संविधानाचे 'वैचारिक मारेकरी' असे संबोधले असून, या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाचे गणित
सदावर्ते यांनी संविधानातील कलमांचा संदर्भ देत मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे (Delimitation) महत्त्व विशद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार,
- संविधानाच्या कलम 82 आणि 170 नुसार जनगणनेनंतर पुनर्रचना होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
- जर हे विधेयक पूर्णतः अंमलात आले, तर लोकसभेत महाराष्ट्राच्या जागा 48 वरून वाढून 72 पर्यंत पोहोचू शकतात.
- यामुळे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील खासदारांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढेल.
- SC खासदारांच्या जागा 5 वरून 8 होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले.
हेही वाचा - Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पुन्हा अडकले; नारी शक्ती वंदन अधिनियमावरून देशात मोठा राजकीय वाद
काँग्रेसवर 'कसाब' म्हणत टीका
काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना सदावर्ते यांनी त्यांना 'वैचारिक दिवाळखोर' म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची हत्या काँग्रेसनेच केली असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मार्गात काँग्रेस अडथळे निर्माण करत असून, त्यांनी याला 'कुटिल नीती' असे संबोधले. इतकेच नाही तर, मागासवर्गीयांचे हक्क रोखणाऱ्यांना त्यांनी 'कसाब'ची उपमा देत, काँग्रेसने महिलांच्या हक्कांची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेवरही त्यांनी या वेळी कडाडून टीका केली.
राज्य सरकारकडे विशेष मागणी
पत्रकार परिषदेच्या शेवटी सदावर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसच्या या 'संविधान विरोधी' कृत्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात यावा, असे त्यांनी सुचवले. महिला आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या वाढीव जागांचे मारेकरी म्हणून काँग्रेसला उघडे पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, राज ठाकरे हे केवळ टेंडर आणि महानगरपालिकेच्या धंद्यांसाठी सरकारशी संधान साधतात, असा टोलाही त्यांनी लगावला. संविधानाचा विद्यार्थी म्हणून आपण हा लढा जनतेच्या न्यायालयात घेऊन जाऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Harshvardhan Sapkal: 'शेम ऑन यू पंत!'; जुन्या ट्वीटवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात, महिला आरक्षणावरून नवा वाद