Hand Dryer Health Risk: आजकाल मॉल, ऑफिस, हॉटेल किंवा सार्वजनिक शौचालयात हात वाळवण्यासाठी हँड ड्रायरचा वापर सर्वत्र दिसतो. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार, या हँड ड्रायरमुळे आपल्याला गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. बहुतेक लोकांनी हे न समजता हात धुतल्यानंतर हँड ड्रायरचा वापर करणे सुरू केले आहे, पण त्यामागचं सत्य खूप धक्कादायक आहे.
बंगळुरूच्या ॲस्टर CMI हॉस्पिटलमधील कन्सल्टंट इन्फेक्शस डिसीज आणि ट्रॅव्हल मेडिसिन, डॉ. स्वाती राजगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शौचालयात अनेक लोक हात धुतात, फ्लश चालवतात आणि त्यामुळे हवेत हजारो प्रकारचे जंतू पसरतात. जेव्हा हँड ड्रायर जोरात हवा फेकतो, तेव्हा हे जंतू पुन्हा हवेत मिसळतात आणि तुमच्या हातांवर येतात. त्यामुळे हात वाळवल्यानंतर तुम्ही जर चेहरा, नाक, तोंड किंवा अन्नाला स्पर्श केला, तर सर्दी, फ्लू किंवा पोटाचे आजार होऊ शकतात.'
नारायणा हेल्थ सिटीच्या इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. निधान मोहन म्हणतात की, 'ड्रायरच्या पृष्ठभागावर हात लावल्यासही धोका वाढतो. टॉयलेट फ्लश झाल्यानंतर हवेत E.coli सारखे जीवाणू येतात, जे हातांवर साचतात आणि संसर्गाचा स्रोत ठरू शकतात.' अनेक अभ्यासांनी हेही स्पष्ट केले आहे की जेट एअर ड्रायर साध्या वॉर्म एअर ड्रायरपेक्षा जास्त प्रमाणात जंतू पसरवतात.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की हात वाळवताना पारंपरिक पद्धतीचा वापर करणे अधिक सुरक्षित आहे. पेपर टॉवेल हा सर्वात उत्तम पर्याय आहे. पेपर टॉवेल त्वरीत हात वाळवतो आणि काही प्रमाणात जंतू पुसून टाकतो. जर पेपर टॉवेल उपलब्ध नसतील, तर स्वतःचा स्वच्छ रुमाल किंवा छोटा टॉवेल वापरणे आवश्यक आहे. काही लोक नेहमी पिशवीत टिश्यू ठेवतात, जे देखील हँड ड्रायरपेक्षा सुरक्षित आहे.
तसेच, नैसर्गिकरित्या हात हवा लागून वाळवणे देखील सुरक्षित ठरते. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात नीट धुतले पाहिजेत. साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे. यानंतर योग्य पद्धतीने हात वाळवण्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
हँड ड्रायरमुळे होणारा धोका हे फक्त एक शौचालयाशी संबंधित समस्या नाही, तर सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे. आपल्या हातांची स्वच्छता राखणे आणि सुरक्षित पद्धतीने हात वाळवणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयात हँड ड्रायरच्या वापरापासून सावध राहणे गरजेचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी हात धुणे आणि सुरक्षित पद्धतीने वाळवणे, हे केवळ तुमच्या आरोग्यासाठी नव्हे, तर समाजाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.