Saturday, January 25, 2025 07:08:21 AM

Hindu Protests in Maharashtra Against Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात सकल हिंदू समाजाचे मोर्चे

राज्यात विविध ठिकाणी सकल हिंदू समाजाने बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मोर्चे आयोजित केले.

बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात सकल हिंदू समाजाचे मोर्चे

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी सकल हिंदू समाजाने बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मोर्चे आयोजित केले. लातूर शहरातील गांधी चौकात आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बांगलादेशी पंतप्रधानांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला. धुळ्यात हिंदू समुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली आणि तातडीने कारवाईची मागणी केली. वर्ध्यात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. लासलगावमध्ये मूक मोर्चा काढला गेला, ज्यात नागरिकांनी बांगलादेशी सरकारला चेतावणी दिली. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पंढरपूर, अलिबाग, नंदुरबार, बुलढाणा आणि नागपूरमध्ये विविध ठिकाणी आंदोलने झाली, ज्यात बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवला गेला. या आंदोलनांमध्ये केंद्र सरकारकडून बांगलादेशी सरकारवर दबाव टाकण्याची मागणी करण्यात आली, तसेच संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा जाहीर निषेध लातूर शहरात सकल हिंदू समाजाने केला. आज गांधी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी बांगलादेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच बांगलादेशचे पंतप्रधान यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निषेध केला. या आंदोलनात मानवाधिकार आयोगाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांचे म्हणणे आहे की, बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी सशक्त पावले उचलली पाहिजेत. तसेच, बांगलादेशातील हिंदुवर होणाऱ्या अन्यायास थांबवण्यासाठी तात्काळ ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 

बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज धुळ्यात सकल हिंदू समाजातर्फे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. बांगलादेशात हिंदूंच्या मालमत्तेचे नुकसान तसेच त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढले आहेत, आणि या अत्याचारांना त्वरित थांबवण्याची मागणी केली जात आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्ध्यात आज सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंदू आणि बौद्ध धर्मीयांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वर्ध्यातील हिंदू समाज एकवटला आहे. यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानांना कडक बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला आहे. रामनगर येथील सर्कस ग्राउंडवर सभा होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघेल. यावेळी जिल्हाधिकारी यांना हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन दिले जाईल.

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज लासलगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले आणि अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. बांगलादेशातील सत्ता उच्चटानानंतर हिंदू समुदायावर सातत्याने हल्ले होत असून, याचा निषेध करण्यासाठी निफाड तालुक्यातील लासलगाव आणि परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन मूक मोर्चा काढला. श्रीराम मंदिरापासून लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत प्रमुख मार्गावर महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने हातात फलक धरत मोर्चात सहभागी होऊन आवाज उठवला. यावेळी लासलगाव येथील व्यवसायिकांनी देखील आपल्या दुकानात बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व हिंदुत्ववादी संघटना, भाजप आणि शिवसेना यांनी सहभाग नोंदवला. याआधी उद्धव सेनेनेही अशा स्वरूपाचे आंदोलन केले होते. हिंदू जनजागरण समितीने या मुद्द्यावर सर्व समाज बांधवांना एकत्र आणत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार आणि स्वामी चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अटकेच्या विरोधात सकल हिंदू समाज कोल्हापूर जिल्ह्यात आक्रमक झाला आहे. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी लवकरात लवकर स्वामी चिन्मय कृष्णदास प्रभु यांची बांगलादेशातील तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली. दीपक देसाई, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, सरकारने याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही, तर आंदोलनाची तीव्रता आणि व्याप्ती वाढवली जाईल.


बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पंढरपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सकल हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येत आपला निषेध व्यक्त केला. शंकर आरण्य, इस्कॉन संघटना आणि लिगल पी आर ओ पंढरपूर यांसह विविध सनातनी संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. मोर्चाचे आयोजन करतांना बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.


बांग्‍लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज अलिबाग येथे हिंदू धर्मीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात विविध हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक धरून आपला संताप व्यक्त केला आणि बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची मागणी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत आणि बांग्लादेश सरकारला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली.

बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात नंदुरबारमध्ये संत महंतांच्या उपस्थितीत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. शहादा, तळोदा, नवापूर, धडगाव, आणि अक्कलकुवा तालुक्यांमध्येही निषेध मोर्चे काढण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

बुलढाणा येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आक्रोश-न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. मोर्चाच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त हिंदू बांधवांसाठी आवाज उठवण्याचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात नागपूरमध्ये मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांकडून बांगलादेश सरकारचा निषेध करत रॅली काढण्यात आली. अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच ताज बाग दर्गा नागपूर अध्यक्ष प्यारे खान यांच्या नेतृत्त्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ताज बाग परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली, यावेळी मुस्लिमांनी बांगलादेश सरकारच्या निषेधार्थ फलक हातात धरून रॅलीत सहभाग घेतला होता.


सम्बन्धित सामग्री