Monday, March 09, 2026 02:58:08 AM

Passport Application : आता मोठ्या शहरांच्या फेऱ्या बंद; घरबसल्या अर्ज करा अन् काही दिवसांतच मिळवा 'पासपोर्ट'; पाहा नवे नियम आणि खर्च

आताचे तरुण केवळ फिरण्यासाठीच नाही, तर उच्चशिक्षणासाठी आणि करिअरसाठी परदेशाला पसंती देत आहे. आता या परदेशप्रवासासाठी लागणारा पासपोर्ट मिळवणे सोपे झाले आहे. जाणून घ्या, सर्व काही..

passport application  आता मोठ्या शहरांच्या फेऱ्या बंद घरबसल्या अर्ज करा अन् काही दिवसांतच मिळवा पासपोर्ट पाहा नवे नियम आणि खर्च

Passport Application : परदेशवारी करण्याचे स्वप्न पाहताय? आता यासाठी काढावा लागणारा पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा कित्येक पटीने सोपी झाली आणि वेगवान झाली आहे. वारंवार मोठ्या शहरांच्या वाऱ्या करणे आणि तासनतास वाट पाहणे आता बंद झाले आहे. याऐवजी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच पासपोर्टची सर्व कामे पूर्ण होत आहेत. पोलीस पडताळणीतील गती आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे आता काही दिवसांतच पासपोर्ट तुमच्या हातात पडू शकतो.

कुठे आणि कसा करावा अर्ज?
पासपोर्ट काढण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. भारत सरकारच्या अधिकृत 'Passport Seva' या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता. विशेष म्हणजे, आता 'mPassport Seva' या मोबाईल ॲपमुळे तुम्ही स्मार्टफोनवरूनही अर्ज भरणे, फी भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे यांसारखी कामे करू शकता. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तुमच्या सोयीनुसार जिल्हा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राची (POPSK) वेळ (Appointment) घेऊन तिथे बायोमेट्रिक आणि कागदपत्र तपासणी पूर्ण करता येते.

किती येईल खर्च आणि किती दिवस लागतील?
पासपोर्टच्या प्रकारानुसार त्याचे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
साधारण पासपोर्ट (Adult - 36 Pages): या सविस्तर प्रक्रियेसाठी 1,500 रुपये शुल्क आकारले जाते. याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 30 ते 45 दिवस लागतात.
तत्काळ पासपोर्ट : जर तुम्हाला तातडीने परदेशात जायचे असेल, तर तत्काळ सुविधेचा वापर करता येतो. यासाठी साधारण शुल्काव्यतिरिक्त 2,000 रुपये अतिरिक्त (एकूण 3,500 रुपये) भरावे लागतात. तत्काळ पासपोर्ट केवळ 1 ते 7 दिवसांत मिळू शकतो.
लहान मुलांसाठी (Minors): 18 वर्षाखालील मुलांच्या 36 पानांच्या पासपोर्टसाठी 1,000 रुपये शुल्क लागते.

हेही वाचा - Aadhaar Deactivated: UIDAI ची मोठी कारवाई; देशातील 2.5 कोटी आधार क्रमांक कायमचे हटवले, 'या' एका कारणामुळे घेण्यात आला निर्णय

ही कागदपत्रे तयार ठेवा
पासपोर्ट अर्जासाठी काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते, जी पडताळणीसाठी सोबत नेणे गरजेचे आहे.
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
- जन्मतारखेचा पुरावा: जन्माचा दाखला किंवा 10 वीचे सर्टिफिकेट (Board Certificate).
- पत्त्याचा पुरावा: लाइट बिल, बँकेचे पासबुक किंवा रेशन कार्ड.

परदेशवारीच्या संधी वाढल्या
आताचे तरुण केवळ फिरण्यासाठीच नाही, तर उच्चशिक्षणासाठी आणि करिअरसाठी परदेशाला पसंती देत आहे. विशेषतः अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि मध्य आशियातील देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आयटी क्षेत्र आणि जागतिक व्यापारामुळे तरुणांची परदेशवारी वाढली असून, सरकारने सुलभ केलेली पासपोर्ट प्रक्रिया या स्वप्नांना बळ देत आहे. पोलीस पडताळणी आता थेट टॅबवरून डिजिटल पद्धतीने होत असल्याने, पूर्वी लागणारा महिनाभराचा वेळ आता काही दिवसांवर आला आहे.

हेही वाचा - Data Tracking : सावधान! फेसबुक-इन्स्टाग्राम ठेवतं तुमच्यावर पाळत? ऑनलाईन डेटा चोरी रोखण्यासाठी 'ही' सेटिंग आताच बदला


सम्बन्धित सामग्री