मुंबई : नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही पण मलिकांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. आशिष शेलार यांनी ही माहिती जाहीररित्या दिली आहे. ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मलिकांचा प्रचार करणार नसल्यामुळे सरकार आले तर त्यांना मंत्री करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक प्रकरण
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला सुरू असल्यामुळे आणि आरोप गंभीर असल्यामुळे भाजपाने नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी करुन घेण्यास नकार दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाचा पाठिंबा नसेल अशीही भूमिका भाजपाने घेतली. भाजपाची भूमिका जाहीर असूनही आत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांना उमेदवारी अर्ज भरण्याकरिता एबी फॉर्म दिला.