Monday, March 09, 2026 02:09:14 AM

Holi 2026 : बाजारातील रासायनिक रंगांना द्या सुट्टी! घरच्या घरी तयार करा 7 नैसर्गिक रंग; त्वचा आणि केस राहतील सुरक्षित

हे घरगुती रंग केवळ सुरक्षितच नाहीत तर ते त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. बाजारातील रंगांप्रमाणे हे रंग काढण्यासाठी तासनतास घासण्याची गरज भासत नाही.

holi 2026  बाजारातील रासायनिक रंगांना द्या सुट्टी घरच्या घरी तयार करा 7 नैसर्गिक रंग त्वचा आणि केस राहतील सुरक्षित

Natural holi Colours At Home : होळी आणि रंगपंचमीचा सण म्हणजे आनंदाची उधळण, पण बाजारात मिळणाऱ्या रासायनिक रंगांमुळे अनेकदा त्वचा आणि केसांचे नुकसान होते. या रंगांमधील घातक रसायनांमुळे ॲलर्जी किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. यावर उत्तम उपाय म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंग तयार करणे. यामुळे तुम्ही तुमची त्वचा आणि केस सुरक्षित ठेवून निर्धास्तपणे रंगपंचमीचा आनंद घेऊ शकता. खाली दिलेल्या कृतींच्या मदतीने तुम्ही सुके रंग बनवू शकता. हेच रंग पाण्यात मिसळून पाण्यातले रंग म्हणूनही वापरता येतील.

पिवळा आणि गुलाबी रंग कसा बनवाल?
पिवळा रंग तयार करण्यासाठी घरातील बेसन आणि हळद एकत्र करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. हळदीमधील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. ओला रंग हवा असल्यास झेंडूची फुले पाण्यात उकळून तुम्ही गडद पिवळा रंग मिळवू शकता. गुलाबी रंगासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि सदाफुलीच्या पाकळ्या बारीक करून पाण्यात उकळून घ्या. त्या पाण्याचा रंग बदलल्यावर त्यात आरारोट पावडर मिसळा आणि हे मिश्रण उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करा.

लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाची जादू
लाल रंग बनवण्यासाठी वाळलेल्या जास्वंदाच्या फुलांची पावडर पिठात मिसळा. नैसर्गिक ओल्या लाल रंगासाठी गाजर पाण्यात उकळून त्याचा अर्क वापरता येतो. निळ्या रंगासाठी गोकर्णाची किंवा इतर काही निळ्या किंवा निळसर रंगाची फुले वापरावीत. ती थोड्या पाण्यात चांगली उकळवून त्यात थोडे पीठ मिसळावे आणि चांगले सुकवून घ्यावे. सुकल्यावर खडे झाले असतील तर पुन्हा वाटून पावडर करावी.  हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये थोड्या पाण्यासह वाटून घ्या. ही पेस्ट कॉर्नफ्लॉवर किंवा टॅल्कम पावडरमध्ये मिसळा. यात सुगंधी अनुभवासाठी 1 टेबलस्पून गुलाबपाणी देखील टाकता येते.

हेही वाचा - Holi 2026: देशातल्या 'या' ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरा होतो रंगांचा सण; कुठे कपडे फाडले जातात तर कुठे लाठ्यांचा वर्षाव!

नारंगी आणि ब्राऊन रंगाचे सोपे पर्याय
नारंगी रंग मिळवण्यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर त्या उकळून घ्या. त्यात कॉर्नफ्लॉवर घालून वाळवल्यास उत्तम नारंगी पावडर तयार होते. ब्राऊन किंवा तपकिरी रंगासाठी कॉफी पावडर किंवा चहा पावडरचा वापर करा. चहाचे पाणी कॉर्नफ्लॉवर किंवा मुलतानी मातीत मिसळून तुम्ही घरच्या घरी सुरक्षित ब्राऊन रंग तयार करू शकता.

नैसर्गिक रंगांचे फायदे
हे घरगुती रंग केवळ सुरक्षितच नाहीत तर ते त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. बाजारातील रंगांप्रमाणे हे रंग काढण्यासाठी तासनतास घासण्याची गरज भासत नाही. या पर्यावरणपूरक पद्धतीमुळे पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. त्यामुळे यावर्षीची रंगपंचमी नैसर्गिक रंगांनी साजरी करून आपले आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही जपा.

हेही वाचा - No Holi in these Countries : इथे होळी अन् रंगांना बंदी! 'या' देशांत धुळवड खेळल्यास थेट तुरुंगवास; चाबकाचे फटकेही बसू शकतात, वाचा कठोर नियम


सम्बन्धित सामग्री