पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताने आतापर्यंत नऊ पदके जिंकली आहेत. यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पुरुष एकेरीचा सामना २१-१४, १८-२१, २३-२१ असा जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. अवनी लेखराने नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. मनिष नरवालने नेमबाजीत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारात रौप्यपदक पटाकवले. निषाद कुमारने अॅथलेटिक्समध्ये पुरुषांची उंच उडी या प्रकारात रौप्यपदक पटाकवले. योगेश कथुनियाने थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. मोना अग्रवालने नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले. प्रीती पालने अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या शंभर मीटर आणि दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदके पटकाविली. रुबिना फ्रान्सिसने नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारात कांस्यपदक पटकावले. भारताकडून एकाच दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात दोन कांस्यपदके पटकावण्याची किमया यंदा प्रीती पालने केली.
अवनीने यंदा नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याआधी अवनीने २०२१ मध्ये टोकियो दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात सुवर्णपदक जिंकले होते आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये कांस्यपदकही पटकावले होते.
योगेश कथुनियाला थाळीफेकमध्ये रौप्य
योगेश कथुनियाने थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. त्याने पहिल्या प्रयत्नात ४२.२२ मीटर अंतरावर, दुसऱ्या प्रयत्नात ४१.५० मीटर अंतरावर, तिसऱ्या प्रयत्नात ४१.५५ मीटर अंतरावर, चौथ्या प्रयत्नात ४०.३३ मीटर अंतरावर, पाचव्या प्रयत्नात ४०.८९ मीटर अंतरावर थाळी फेकली. योगेशने याआधी टोकियोत दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात रौप्यपदक जिंकले होते.