Ravindra Jadeja Player of the Match : बुधवारी झालेल्या IPL 2026 मधील रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 40 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 6 बाद 159 धावांचे आव्हान उभे केले होते, ज्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 18 षटकांत केवळ 119 धावांवर गारद झाला. राजस्थानच्या या विजयात अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने आपला प्रभाव पाडला. त्याच्या या कामगिरीमुळे राजस्थानला स्पर्धेत महत्त्वपूर्ण गुण मिळाले आहेत.
जडेजाची झुंजार खेळी आणि पत्नीला पुरस्कार
जेव्हा राजस्थानच्या वरच्या फळीतील फलंदाज ढेपाळले होते, तेव्हा जडेजाने 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत नाबाद 43 धावा कुटल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 1 षटकार खेचला. 37 वर्षीय जडेजाने सामनावीर (Player of the Match) पुरस्कार पटकावल्यानंतर तो आपली पत्नी आणि गुजरातची शिक्षण मंत्री रिवाबा जडेजा हिला समर्पित केला. जडेजाने सांगितले की, "रिवाबाने मला आदल्या दिवशीच सांगितले होते की मी या सामन्यात चांगली कामगिरी करेन, आणि मी अगदी तसेच करून दाखवले."
हेही वाचा - LSG Vs RR IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्सचा फ्लॉप शो! 159 धावांचा पाठलाग करताना दाणादाण; राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड
इकानाची खेळपट्टी आणि गोलंदाजीचा थरार
लखनऊच्या इकाना स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असल्याचे जडेजाने कबूल केले. त्याने निकोलस पूरनचा (22) महत्त्वाचा बळी घेत लखनऊला मोठा धक्का दिला. आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, चेंडू थोडा थांबून येत होता, त्यामुळे त्याने संथ गतीचा वापर केला ज्याचा फायदा संघाला झाला. त्याने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 29 धावा खर्च केल्या. शुभम दुबेसोबत (नाबाद 19) त्याने केलेली 49 धावांची अभेद्य भागीदारी राजस्थानला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी महत्त्वाची ठरली.
राजस्थानच्या फलंदाजांचे अपयश आणि जडेजाची साथ
या सामन्यात राजस्थानचा टॉप ऑर्डर सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी जायसवाल (22), रियान पराग (20) आणि हेटमायर (22) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एका वेळी राजस्थानची स्थिती 5 बाद 77 अशी नाजूक होती. अशा वेळी जडेजाने डोनोवन फरेरा (20) सोबत 33 धावांची महत्त्वाची भागीदारी करून डाव सावरला. लखनऊच्या वतीने मोहम्मद शमी आणि मोहसिन खान यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली, परंतु जडेजाच्या अनुभवापुढे लखनऊचं काही चाललं नाही.
हेही वाचा - ICC Fines Bangladesh Cricket Team: बांगलादेश संघाला ICC चा झटका; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर 'या' कारणामुळे मोजावा लागणार मोठा दंड