धाराशिव शहरातून आज 'जनआक्रोश' मोर्चा काढण्यात येणार आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबतच्या गंभीर घटनांची जाणीव सरकारला करून देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय, सर्व समाजबांधवांच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ यापूर्वी बीड, परभणी, पैठण आणि जालना येथे मोर्चे काढून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तथापि, संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जनतेचा हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठीच धाराशिव शहरात आज सर्वपक्षीय व सर्व समाजबांधवांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मोर्चात यांचा असेल सहभाग
धाराशिव शहरातून निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चात स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आ. जितेंद्र आव्हाड, भाजपा आमदार सुरेश धस, पवारांची राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारही सहभागी होणार आहेत.
मोर्चाचा मार्ग
जनआक्रोश मोर्चाला धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून प्रारंभ होईल. यानंतर हा मोर्चा लेडीज क्लब, संत गाडगेबाबा चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दाखल होईल. या ठिकाणी मोर्चात सहभागी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपले विचार मांडतील. या मोर्चाद्वारे सरकारकडे न्याय मिळवण्याची आणि दोषींना शिक्षा दिली जावी यासाठी जनआक्रोश व्यक्त केला जाईल.
👉👉 हे देखील वाचा : जालन्यातील जनआक्रोश मोर्चातील आयोजकांना नोटीस