मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सरचिटणीस जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अर्थात आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते १ डिसेंबर २०२४ पासून ग्रेग बार्कले यांच्याकडून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.
जय शाह हे ३६ वर्षांचे आहेत. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे सर्वात तरुण अध्यक्ष होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. जय शाह यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीत महिला क्रिकेट हाताळण्यासाठी स्वतंत्र महिला अध्यक्ष शोधणे ही जय शाह यांच्यापुढील सर्वात मोठी जबाबदारी असेल. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती आयोजित करत असलेल्या स्पर्धांचे प्रसारण हक्क हा विषय पण त्यांना हाताळावा लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाचा राजीनामा देण्याआधी सक्षम उत्तराधिकारी शोधून मंडळाचा कारभार सुरळीत सुरू ठेवण्याचेही आव्हान त्यांच्यापुढे असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे २०२८ मध्ये ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेटच्या वाढीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारीही जय शाह यांच्या नेतृत्वातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची असेल.