Sunday, May 10, 2026 08:27:43 PM

Kailash Mansarovar Yatra 2026: कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची पद्धत आणि अटी जाणून घ्या

कैलास मानसरोवर यात्रा ही प्रवासासाठी कठीण असलेली यात्रा आहे. यासाठी शारीरिक क्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अनेक नियमांमधून जावे लागते.

kailash mansarovar yatra 2026 कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू अर्ज करण्याची पद्धत आणि अटी जाणून घ्या

Kailash Mansarovar Yatra 2026 : हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेचे वेध आता भाविकांना लागले आहेत. हिमालयीन रांगांमधील या आध्यात्मिक प्रवासासाठी 2026 या वर्षाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यात्रेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुक प्रवाशांनी वेळेत आपली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दरवर्षी विदेश मंत्रालय जून ते सप्टेंबर या कालावधीत या यात्रेचे आयोजन करते; ज्यामध्ये सहभागी होण्याचे हजारो लोकांचे स्वप्न असते.

निवड प्रक्रिया आणि पात्रता
कैलास मानसरोवर यात्रा ही प्रवासासाठी कठीण असलेली यात्रा आहे. यासाठी शारीरिक क्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे. या आव्हानात्मक प्रवासासाठी प्रवाशांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जाते. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 'कम्प्युटराईज्ड लकी ड्रॉ'द्वारे नशीबवान प्रवाशांची नावे निश्चित केली जातात. निवड झालेल्या व्यक्तीला निर्धारित शुल्क भरावे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठोर वैद्यकीय चाचणी (Medical Test) उत्तीर्ण करावी लागते. यात्रेसाठी खालील काही प्रमुख अटी आहेत:

- अर्जदार केवळ भारतीय नागरिक असावा.
- व्यक्तीचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- प्रवासी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असावी.

यात्रेचे दोन मार्ग आणि अनुभव
कैलास मानसरोवर गाठण्यासाठी भारत सरकार दोन प्रमुख मार्गांचा वापर करते, ज्यांचा अनुभव आणि खर्च वेगवेगळा असतो.
- लिपुलेख दर्रा (उत्तराखंड): हा मार्ग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, मात्र येथे ट्रेकिंग किंवा पायी चालावे लागण्याचे प्रमाण जास्त आहे.
- नाथू ला दर्रा (सिक्कीम): लिपुलेखच्या तुलनेत हा मार्ग अधिक सोयीस्कर आणि सुखकर मानला जातो, कारण येथे कमी पायी चालावे लागते.
साधारणपणे 3 आठवड्यांच्या या प्रवासात मानसिक कणखरतेची खरी कसोटी असते.

हेही वाचा - How to reach Kedarnath Dham : केदारनाथ यात्रा करायची आहे? कसं जायचं.. विमान, रेल्वे की बस? जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण रूटमॅप

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
यात्रेसाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला पासपोर्ट आणि फोटो यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर, संबंधित माहिती प्रवाशांना SMS आणि ईमेलद्वारे कळवली जाते. निवड झालेल्या यात्रेकरूंची उंचीवरील क्षेत्रातील ऑक्सिजनची पातळी आणि फिटनेस तपासण्यासाठी विशेष तपासणी केली जाते, जेणेकरून ही पावन यात्रा सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडू शकेल.

मानसरोवर यात्रेवरून यंदाही वाद
भारताने जून ते ऑगस्ट या कालावधीत यात्रेची घोषणा करताच, नेपाळने लिपुलेखवर आपला हक्क सांगत विरोध दर्शवला होता. मात्र, भारताने नेपाळचा हा विरोध फेटाळून लावला आहे. यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी चर्चा केली नाही, असे म्हणत नेपाळने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या आक्षेपाला भारत सरकारने रोखठोक उत्तर दिले आहे. "लिपुलेख खिंडीचा मार्ग हा काही नवा नाही. 1954 पासून हा मार्ग कैलास मानसरोवर यात्रेचा मुख्य मार्ग राहिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून याच मार्गाने यात्रा होत आहे. या विषयावर भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि सुसंगत राहिली आहे," असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा - May 2026 Pornima Shubh Yog : मे महिन्यात दुर्मीळ 'दुहेरी पौर्णिमा' योग; जाणून घ्या, 'फ्लॉवर मून' आणि 'ब्लू मून'चे ज्योतिष आणि खगोलशास्त्रीय महत्त्व


सम्बन्धित सामग्री