Wednesday, February 18, 2026 05:07:12 PM

KDMC Election Results 2026 : केडीएमसीमध्ये महायुतीचा 'डंका'; निकाल पूर्ण होण्याआधीच भाजपकडून 50-50 चा 'महापौर' फॉर्म्युला!

कल्याण-डोंबिवलीवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा भाजपने मिळवलेला दणदणीत विजय पाहता, सत्तेत समान वाटा हवा असा पवित्रा भाजपने घेतला आहे.

kdmc election results 2026  केडीएमसीमध्ये महायुतीचा डंका निकाल पूर्ण होण्याआधीच भाजपकडून 50-50 चा महापौर फॉर्म्युला

KDMC Election Results 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या (KDMC Election 2026) निकालांनी आज, शुक्रवारी (16 जानेवारी 2026) पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निकालात भाजप-शिवसेना महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून, केडीएमसीमध्येही सत्तेची चावी महायुतीकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात थेट महापौरपदावर दावा ठोकून राजकीय पेच निर्माण केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी "युती धर्म पाळून भाजपला अडीच वर्षे महापौरपद मिळावे," अशी आग्रही मागणी केली आहे.

भाजपचा महापौरपदासाठी 50-50 फॉर्म्युला
कल्याण-डोंबिवलीवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा भाजपने मिळवलेला दणदणीत विजय पाहता, सत्तेत समान वाटा हवा असा पवित्रा भाजपने घेतला आहे. नंदू परब यांनी सुचवलेला 50-50 चा फॉर्म्युला शिवसेनेसाठी (शिंदे गट) पेचात टाकणारा ठरू शकतो. शिवसेनेचा हा बालेकिल्ला असून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय आहे. तरीही, भाजपने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही मागणी लावून धरल्याने महायुतीमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - Pune Election Results : पुण्यात देवाभाऊंना 'भाव', दादांची 'दादागिरी' संपुष्टात

केडीएमसीचे आकडे: महायुती बहुमताच्या जवळ
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 122 जागांसाठी झालेल्या मतदानात चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार, शिवसेनेने 36 जागांवर तर भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीची एक मोठी वैशिष्ट्ये म्हणजे मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार (भाजप 15 आणि शिवसेना 7) बिनविरोध निवडून आले होते. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांपैकी महायुतीने आताच 61 जागांचा टप्पा ओलांडला असून, अपक्ष किंवा मित्रपक्षांच्या मदतीने महायुती सहज सत्ता स्थापन करेल असे चिन्ह आहे.

विरोधकांचा सुपडा साफ; मनसेचे अस्तित्व कायम
या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही खाते उघडता आलेले नाही, ही मोठी धक्कादायक बाब ठरली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर राज ठाकरेंच्या मनसेने 3 जागा जिंकत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण 52.11% मतदान पार पडले होते. भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाच्या तडजोडीनंतरही महापौरपदावरून आता पुन्हा एकदा नवा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा - Solapur Election Results 2026: काँग्रेसच्या शिंदेंनी नाही तर भाजपच्या शिंदेंनी गाजवलं सोलापूर; महापालिकेत भाजपच्या विजयाचा गुलाल

केडीएमसीत भाजपने दाखवलेली ताकद आणि शिवसेनेची (शिंदे गट) बालेकिल्ल्यातील पकड यामुळे महायुती भक्कम असली तरी, महापौरपदाची खुर्ची कोणाकडे जाणार यावर चर्चा रंगली आहे. आजच्या निकालाने विरोधकांच्या गोटात शांतता पसरली असली तरी, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महायुतीमधील 'कलगितुरा' आता सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.


सम्बन्धित सामग्री