चंदीगड : हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांच्यावर चंदीगड विमानतळावर हल्ला झाला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने हा हल्ला केला. या प्रकरणात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने संबंधित महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात होता असा आरोप कंगनाने केला होता. या वक्तव्यामुळे संतापलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने कंगनावर चंदीगड विमानतळावर हल्ला केला. हल्ल्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कंगनाने केला, त्यावेळी हल्लेखोर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने शेतकरी आंदोलनाच्या विरोधात बोलल्यामुळे आलेल्या रागातून हल्ला केल्याचे सांगितले.