Karwa Chauth Vrat Katha : करवा चौथ (Karwa Chauth) हा हिंदू विवाहित महिलांसाठी (Married Women) सर्वात पवित्र आणि लोकप्रिय सणांपैकी एक आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हे व्रत केले जाते. पती-पत्नीमधील प्रेम, समर्पण आणि वैवाहिक नात्याच्या मजबुतीचे हे प्रतीक मानले जाते. या दिवशी महिला सूर्य उगवल्यापासून चंद्र दिसेपर्यंत (चंद्रोदयापर्यंत) निर्जला व्रत ठेवतात आणि पतीच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
करवा चौथचा अर्थ आणि पौराणिक महत्त्व
'करवा' शब्दाचा अर्थ मातीच्या घडा असा आहे, जे शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 'चौथ' म्हणजे उत्तर भारतीय पंचांगानुसार आणि दिनदर्शिकेनुसार ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चौथी तिथी (Fourth Day) असते. (तर, महाराष्ट्रातील पंचांगानुसार, ही अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील चौथी तिथी असते.)
करवा चौथ व्रताची सुरुवात पौराणिक कथा आणि परंपरांशी जोडलेली आहे. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे कठोर तप आणि व्रत केले होते. माता पार्वतीचे हे समर्पण विवाहित महिलांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रेरित करते.
महिलांना एकत्र आणणारा सण : हा सण केवळ पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक नाही, तर महिलांच्या आपसातील सहकार्याचा आणि भगिनी भावाचा उत्सव आहे. या दिवशी महिला एकत्र सजतात, पूजा करतात, कथा ऐकतात आणि एकमेकींना शुभेच्छा देतात.
करवा चौथची तिथी आणि वेळ (2025)
यावर्षी करवा चौथ शुक्रवारी, 10 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जात आहे.
चतुर्थी तिथी प्रारंभ: 9 ऑक्टोबर, रात्री 10:54 वाजता.
चतुर्थी तिथी समाप्ती: 10 ऑक्टोबर, सायंकाळी 7:38 वाजता.
हिंदू पंचांगानुसार, करवा चौथचे व्रत उदय तिथीनुसार (जी तिथी सूर्योदयाच्या वेळी असते) ठेवले जात असल्याने, हे व्रत 10 ऑक्टोबर 2025 रोजी पाळले जाईल.
हेही वाचा - Tilak : कपाळावर टिळा, गंध, नाम किंवा हळद-कंकू का लावतात? जाणून घ्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
व्रत विधी आणि पूजा
करवा चौथच्या दिवशी महिला सकाळी सूर्योदयापूर्वी 'सरगी' (उपाहार म्हणून आलेले भोजन) खातात आणि त्यानंतर दिवसभर निर्जला (पाणी न पिता) व्रत करतात.
सरगी खाण्याचा मुहूर्त : 10 ऑक्टोबरच्या पहाटे म्हणजेच, सूर्योदयाआधी 4.40 ते 5.30 हा करवा चौथचे व्रत करणाऱ्या महिलांसाठी शुभ आणि पवित्र मुहूर्त आहे. (अल्पोपाहारामध्ये फळे आणि सुका मेवा यांचा समावेश असतो. यामागे दिवसभराच्या उपासादरम्यान शरीरात कमजोरी निर्माण होऊ नये, हा उद्देश असतो.)
पूजा: चंद्रोदय झाल्यावर महिला नटून-थटून करवा चौथची पूजा करतात. या पूजेत करवा (मातीचे भांडे), दिवा, तांदूळ, मिठाई आणि सात सौभाग्यसामग्रीला विशेष महत्त्व असते.
कथा : महिला एकत्र येऊन कथा ऐकतात आणि माता गौरी तसेच भगवान शंकराची आराधना करतात. चंद्र दिसल्यानंतर त्याला अर्घ्य देऊन पतीच्या हातून पाणी पिऊन त्या उपवास सोडतात.
करवा चौथची कथा
पौराणिक कथेनुसार, वीरावती नावाची एक राणी होती जी तिच्या सात भावांची एकुलती एक लाडकी बहीण होती. तिने पहिल्यांदा करवा चौथचे व्रत केले, तेव्हा दिवसभर उपाशी-तहानलेली राहिल्याने ती खूप अशक्त झाली. आपल्या बहिणीची अवस्था पाहून भावांनी एक युक्ती केली आणि डोंगरावर दिवा लावून चंद्रासारखे दृश्य निर्माण केले. वीरावतीला तो खरा चंद्र वाटला आणि तिने उपवास सोडला. परिणामी, तिच्या पतीचा मृत्यू झाला.
यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिने खऱ्या मनाने माता पार्वतीची पूजा सुरू केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता पार्वतीने तिला वरदान दिले आणि तिच्या पतीला पुन्हा जिवंत केले. तेव्हापासून महिला श्रद्धा आणि विश्वासाने हे व्रत ठेवतात, जे केवळ पती-पत्नीच्या प्रेमाचेच नव्हे, तर नारीच्या भक्ती, शक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
हेही वाचा - Kartik Marathi Month : कार्तिक मासात पाळा 'हे' 7 विशेष नियम, मिळेल कधीही न संपणारे अक्षय्य पुण्य
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)