Kedarnath Dham Darshan : यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या मंदिरांचे दरवाजे 30 एप्रिल 2025 रोजी उघडल्यानंतर, 2 मे रोजी केदारनाथ धामाचेही दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. तर, 4 मे रोजी बद्रीनाथ धाम दर्शनासाठी खुले झाले आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 11 हजार फूट उंचीवर असलेले केदारनाथ मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते. जर, तुम्हीही यंदा किंवा इतर केव्हाही केदारनाथ दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर येथेच असलेल्या याही देवांचं आणि ठिकाणांचं दर्शन घ्यायचं नक्की लक्षात ठेवा.
1) पशुपतिनाथाचे दर्शन
पशुपतिनाथ हे शिवशंकराचे रूप असून समस्त भाविक त्याला खूप मानतात. बाबा केदारनाथ हे शिवाचे अधूरे स्वरूप मानले जाते. पुराणांनुसार, जेव्हा पांडव स्वर्गप्राप्तीसाठी निघाले होते, तेव्हा भगवान शिवांनी त्यांना रेड्याच्या रूपात दर्शन दिले. त्यावेळी भीम यांनी त्या रेड्याच्या शेपटी आणि पाठीला धरले आणि ते स्वरूप पृथ्वीमध्ये विलीन झाला. त्या ठिकाणालाच आज आपण केदारनाथ म्हणून ओळखतो. मात्र, शिवाचा मुखभाग जो पृथ्वीवर उरला, तो आज नेपाळमधील काठमांडू येथील ‘पशुपतिनाथ मंदिरात’ आहे. त्यामुळे केवळ केदारनाथ नव्हे, तर पशुपतिनाथ मंदिराचंही दर्शन घेणं, म्हणजेच पूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन होय. येथे जाण्यासाठी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण कराव्यात.
हेही वाचा - निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट अनुष्कासह पोहोचला वृंदावनात; प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर झाले भावुक
2)नर-नारायण ऋषींच्या तपश्चर्येच्या स्थळाचे दर्शन
पुराणांनुसार, हिमालयातील केदार शिखरावर नर-नारायण ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांच्या आराधनेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तेथेच ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करण्याचा वर त्यांनी दिला. आजचं केदारनाथ मंदिर हे त्याच जागेवर वसलेलं आहे. या पर्वतशिखराचे दर्शन नक्की घ्या, कारण, याला शिवपुराणातही महत्त्व दिलं आहे.
3)आदिशंकराचार्यांची समाधी दर्शन
भारतीय संस्कृतीत आदिशंकराचार्य आणि त्यांचं तत्त्वज्ञान यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. केदारनाथ मंदिराच्या मागेच आदिशंकराचार्य यांची समाधी आहे. त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यांच्या कार्यामुळे आज आपल्याला केदारनाथ दर्शन घडतं आहे. ही समाधीस्थळ अत्यंत पवित्र मानली जाते आणि भाविकांनी इथे श्रद्धेने नमन करावं.
4)चमत्कारी शिला दर्शन
2013 साली केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुरात 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, मंदिर मात्र एका विशाल शिलेमुळे वाचलं. त्यावेळी मंदिरात आश्रय घेतलेल्या 300 ते 500 लोकांचे प्राणही वाचले. ही डमरूच्या आकाराची शीला वरून लोटत आली आणि मंदिराच्या अगदी मागे 50 फुटांवर थांबली. त्यामुळे पूराचे पाणी दोन भागांमध्ये विभागले गेले आणि मंदिर वाचलं. आजही ही शिला मंदिराजवळ ठेवलेली आहे, आणि भाविक श्रद्धेने तिचं दर्शन घेतात.
5) मंदाकिनी नदीत पिंडदान व तर्पण
केदारनाथाजवळून वाहणारी मंदाकिनी नदी, तसेच, बद्रीनाथमध्ये भेटणारी सरस्वती आणि अलकनंदा नदी या तीर्थस्थानांना अत्यंत पवित्र मानलं जातं. या नद्यांच्या तीरावर पितृ तर्पण आणि पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असं मानलं जातं. विशेषतः बद्रीनाथातील ब्रह्मकपाल येथे तर्पण करणं अधिक फलदायी मानलं जातं.
हेही वाचा - Shri Kedarnath Dham 2025 : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; भक्तिमय वातावरणात तीर्थयात्रेला सुरुवात