कोपरगाव तालुक्यातील कोल्हे कुटुंबीयांनी गेल्या 5 वर्षांत 125 हून अधिक मुलींचं कन्यादान करत सामाजिक बांधिलकीचं अनोखं उदाहरण घालून दिलं आहे. आपल्या मुलीचं कन्यादान करण्यासाठी भाग्य लागतं असं नेहमी म्हटलं जातं, पण कोल्हे कुटुंबीयांनी समाजातील सर्व स्तरांतील मुलींसाठी हे भाग्य प्राप्त करून दिलं आहे. विशेष म्हणजे, हिंदूच नव्हे तर सर्व धर्मातील विवाह सोहळे एकत्रितरित्या पार पाडत त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा आदर्शही समाजासमोर ठेवला आहे.
कोपरगाव शहरात नुकताच संपन्न झालेला सामुदायिक विवाह सोहळा हा भव्यतेचा कळस होता. सोळा नवरदेव, हजारो वऱ्हाडी, शहरातून निघालेली भव्य मिरवणूक आणि शाही विवाह सोहळा असं देखणं चित्र या सोहळ्यात पाहायला मिळालं. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. यंदाच्या सोहळ्यात सर्वधर्मीय साधू-संतांच्या उपस्थितीत विवाह पार पडले.
या विवाह सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे सहभागी होणाऱ्या सर्व कुटुंबांची घरातील लग्नाप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. सकाळचा नाश्ता, रुचकर जेवण, भांडीकुंडी यांचं व्यवस्थापन इतकंच नव्हे, तर मुलींचं कन्यादान करून हा सोहळा आणखीनच विशेष बनवण्यात आला. या भव्य सोहळ्यात भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांची उपस्थिती आणि सहभाग लक्षणीय ठरला. मिरवणुकीत डिजेच्या तालावर त्यांनीही ठेका धरत आनंद साजरा केला.
विवेक कोल्हे यांनी सांगितलं की, आज महागाईमुळे लग्नाचा खर्च अनेकांना परवडत नाही. मात्र, कोल्हे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सामान्य कुटुंबातील लग्नसुद्धा शाही ठरत आहे. यंदाच्या सोहळ्यात मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू धर्मातील विवाह पार पडले. विशेष म्हणजे आंतरजातीय विवाह देखील या सोहळ्याचा भाग होते. 'जागवूया ज्योत माणुसकीची' हे ब्रीद घेऊन काम करत असल्याचं विवेक कोल्हे यांनी नमूद केलं.
कोल्हे कुटुंबीयांचा हा सामाजिक उपक्रम समाजातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विवाह सोहळ्यातील आनंद, मिरवणुकीतील उत्साह, आणि सर्वधर्मीय विवाहांचा एकत्रित सोहळा हीच माणुसकीची खरी ओळख असल्याचं या उपक्रमाने सिद्ध केलं आहे.