Sunday, May 10, 2026 08:07:56 PM

Konkan Railway : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आशेचा किरण! दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

प्रस्तावित तपासणीमध्ये रेल्वे प्रशासन अनेक तांत्रिक बाबींचा विचार करणार आहे. यानंतर या गाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

konkan railway  कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आशेचा किरण दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होणार रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Dadar Ratnagiri Passenger : कोकणवासीयांची अत्यंत सोयीची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा एकदा मुंबईच्या मध्यवर्ती भागातून धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना साथीच्या काळात म्हणजेच 2020 मध्ये ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती, जी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रशासनाला सविस्तर तपासणी करण्याचे निर्देश दिले असून तसे अधिकृत पत्र खासदार रवींद्र वायकर यांना पाठवले आहे. मात्र, या गाडीचा पुनरारंभ पूर्णपणे 'कार्यकारी व्यवहार्यता' (Feasibility Report) अहवालावर अवलंबून असेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

दिवा प्रवासाचा अडथळा आणि प्रवाशांची मागणी
सध्या ही पॅसेंजर दादर ऐवजी दिवा स्थानकावरून सुटते, ज्यामुळे दक्षिण मुंबई तसेच बोरिवली-दहिसर पट्ट्यातील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने तिथून गाडी सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा वेळ वाचू शकतो. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दिवा परिसरातून गाडी चालवताना उपनगरीय रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो, ज्याचा थेट परिणाम दररोजच्या 8 लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. याच तांत्रिक अडचणींचा अभ्यास आता नवीन अहवालात केला जाणार आहे.

हेही वाचा - Digital Land Records : मोठी बातमी! सातबारा आणि 8 अ उतारा आता थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; भूमी अभिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय

तांत्रिक अभ्यास आणि व्यवहार्यता अहवाल
प्रस्तावित तपासणीमध्ये रेल्वे प्रशासन अनेक तांत्रिक बाबींचा विचार करणार आहे. यामध्ये दादर स्थानकावरील फलाटांची उपलब्धता, रेल्वेचे नवीन वेळापत्रक आणि उपनगरीय लोकल सेवांवर होणारा संभाव्य परिणाम यांचा समावेश आहे. दादरहून गाडी सुरू केल्यास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ट्रॅफिकवर किती ताण येईल, याचे विश्लेषण या व्यवहार्यता अहवालात केले जाईल. सध्या या अहवालासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरवण्यात आलेली नसली तरी, हा अहवाल सकारात्मक आल्यास कोकणवासीयांची मोठी सोय होणार आहे.

कोकणवासीयांची प्रतीक्षा संपणार?
प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, आता चेंडू रेल्वे प्रशासनाच्या कोर्टात आहे. उपनगरीय लोकलच्या फेऱ्या विसकळीत न होता या पॅसेंजरला दादरमध्ये जागा कशी मिळवता येईल, हा सर्वात मोठा प्रश्न रेल्वे समोर आहे. अहवाल सादर झाल्यानंतरच या गाडीच्या भवितव्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांना दिवा किंवा पनवेल गाठूनच रत्नागिरीचा प्रवास करावा लागणार आहे.

हेही वाचा - Vaibhav Naik : 'जितके वर्ष महामार्ग रखडला तितके वर्ष टोलमाफी करावी, हीच आमच्यासाठी माफी असेल'; ठाकरे गटाच्या नेत्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी


सम्बन्धित सामग्री