महाराष्ट्र: राज्यात लाडक्या बहिणांना पैसे मिळण्यास सुरुवात झालीय. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आधारकार्ड सिडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते, त्या लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार आहेत. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तब्बल 12 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आला असून या सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स अकाऊंवर पोस्ट केली आहे.
काय आहे पोस्ट?
'महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.'
ही योजना का विशेष आहे?
1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे.
अशी पोस्ट महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान लाडक्या बहिणांना पैसे मिळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.