Tuesday, February 17, 2026 07:56:34 AM

Mahapalika Election Results 2026 : लातुरात काँग्रेसची मुसंडी, तर संभाजीनगरमध्ये 'कमळ' फुलणार? शिरसाट कुटुंबाचा दबदबा

महापालिका निवडणुकांचे हे केवळ सुरुवातीचे कल असून, दुपारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल. निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळायला सुरुवात केली असून, मराठवाड्यातील निकाल लवकरच समोर येतील.

mahapalika election results 2026  लातुरात काँग्रेसची मुसंडी तर संभाजीनगरमध्ये कमळ फुलणार शिरसाट कुटुंबाचा दबदबा

Mahapalika Results 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला आज, शुक्रवार (16 जानेवारी 2026) सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरुवात झाली असून मराठवाड्यातील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आणि जालना या पाच महत्त्वाच्या शहरांचे कल हाती येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लातूरमध्ये काँग्रेसने भाजपला कडवी झुंज देत आघाडी घेतली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने आपली सत्तास्थापनेची दावेदारी भक्कम केली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा कडा पहारा असून ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची सरशी; शिरसाट यांची दोन्ही मुले आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या एकूण 115 जागांपैकी आतापर्यंत 45 हून अधिक जागांचे कल समोर आले आहेत. यात भाजपने 15 जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांनी निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून कन्या हर्षदा शिरसाट आणि प्रभाग 29 मधून पुत्र सिद्धांत शिरसाट हे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने 9, शिवसेना (UBT) गटाने 6 आणि एमआयएमने 8 जागांवर आघाडी मिळवली आहे. ठाकरे गटाचे रशीद मामु यांनीही आपल्या प्रभागात आघाडी घेतल्याने शहरातील लढत चुरशीची होत आहे.

लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये 'काँटे की टक्कर'
लातूर महापालिकेत काँग्रेसने भाजपला 'दे धक्का' म्हणत 16 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजप 12 जागांवर मागे आहे. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, जिथे अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेत भाजपने मोठी झेप घेत 24 जागांवर आघाडी मिळवली असून, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 12 जागांवर झुंज देत आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच मोठी परीक्षा असल्याने नांदेडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Maharashtra Election Results 2026: कोल्हापुरात काँग्रेसचे 'खाते' उघडले; जळगावात 'राजेंद्र घुगे' यांचा विजय

परभणी आणि जालन्यात प्रादेशिक पक्षांचा जोर
परभणी महापालिकेत शिवसेना (UBT) गटाने 8 जागांवर आघाडी घेऊन आघाडी घेतली आहे, तर भाजप केवळ 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आहे. नवनिर्मित जालना महापालिकेत भाजपने सुरुवातीलाच 6 जागांवर आघाडी घेत मुसंडी मारली आहे. जालन्यात रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि त्यांच्या पत्नीने विजय मिळवत भाजपचा पाया भक्कम केला आहे. एकूणच मराठवाड्यातील आकडेवारी पाहता, अनेक ठिकाणी भाजपची लाट दिसत असली तरी लातूर आणि परभणीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचे गणित बिघडवले आहे.

महापालिका निवडणुकांचे हे केवळ सुरुवातीचे कल असून, दुपारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल. प्रशासकीय कारणांमुळे गरवारे स्टेडियमवरील मतमोजणी केंद्रावर सुरुवातीला काही काळ गोंधळ झाला होता, मात्र आता प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळायला सुरुवात केली असून, मराठवाड्यातील या निकालांचे पडसाद आगामी विधानसभा आणि राज्याच्या राजकारणावर निश्चितपणे उमटणार आहेत.

हेही वाचा - Maharashtra Election Results 2026: कुठे जल्लोष, कुठे सन्नाटा! मालाडमध्ये ठाकरे गट तर पुण्यात काँग्रेसने मारली बाजी


सम्बन्धित सामग्री