मुंबई : महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठतकीत १९ निर्णय झाले. महायुती सरकारने मुंबईतून येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी दिली आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केली. सर्व टोलनाक्यांवर नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या किरीट सोमैया यांनी टोलमाफीचे स्वागत करताना शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली.
मुंबईमधील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर, मुलुंड - एलबीएस, आनंदनगर, ऐरोली आणि वाशी या टोलनाक्यांवर आता हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. हलक्या वाहनांना चाळीस रुपये टोल द्यावा लागत होता. हा निर्णय रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहे. यामुळे मंगळवारपासून निर्णयाचा लाभ नागरिकांना घेता येईल.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. याआधी राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर झालेला टोलमाफीचा निर्णय राज्यावरील आर्थिक ताण वाढवेल असा आरोप करत मविआच्या नेत्यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर टीका केली. नेते टीका करत असताना शिउबाठाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून करत असलेल्या आंदोलनाला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया शिउबाठाच्या कार्यकर्त्यांनी दिली. तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात पाठपुरावा केला म्हणून टोलमाफी झाली, अशी प्रतिक्रिया मनसेच्या गजानन काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली.
- मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
- आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
- दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
- पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
- खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
- उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
- कौशल्य विकास विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)