Tuesday, February 17, 2026 07:23:53 AM

Digital Addiction: सोशल मीडिया, मोबाइल आणि टॅबलेटचा मुलांवर परिणाम; राज्य सरकार ने सुरू केली बहुआयामी तज्ज्ञ टास्क फोर्स

लहान मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व सोशल मीडिया व्यसनामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश माहिती व

digital addiction सोशल मीडिया मोबाइल आणि टॅबलेटचा मुलांवर परिणाम राज्य सरकार ने सुरू केली बहुआयामी तज्ज्ञ टास्क फोर्स

Digital Addiction: मोबाइल, टॅबलेट आणि सोशल मीडियाचा वाढता वापर लहान मुलांच्या आयुष्यात चिंतेचा विषय ठरत असताना, राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लहान मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.

अलीकडेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या अहवालात मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, मानसिक तणाव, झोपेच्या समस्या, आक्रमक वर्तन तसेच शारीरिक हालचालींचा अभाव यांसारखे दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धोरणात्मक पातळीवर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री आशिष शेलार यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना याबाबत लेखी निर्देश दिले असून, आर्थिक पाहणी अहवालातील शिफारशींचा सखोल अभ्यास करण्यास सांगितले आहे. केवळ अभ्यासापुरते न थांबता, राज्यासाठी संतुलित आणि माहितीपूर्ण धोरण तयार करण्यासाठी आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रस्तावित टास्क फोर्समध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, बालसमुपदेशक, डॉक्टर, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी असतील. या बहुआयामी तज्ज्ञांच्या मदतीने डिजिटल व्यसनाचे सर्व पैलूंनी विश्लेषण करण्यात येणार आहे.

या टास्क फोर्सच्या कार्यक्षेत्रात मुलांची डिजिटल सुरक्षितता, मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, शिक्षणावर होणारा प्रभाव, कौटुंबिक आणि सांस्कृतिक बदल, ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या समस्या तसेच आर्थिक स्तरानुसार निर्माण होणारे फरक यांचा समावेश असेल. याशिवाय, मुलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा संतुलित आणि जबाबदार वापर कसा सुनिश्चित करता येईल, यावरही अभ्यास केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, मुलांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या डिजिटल जाहिराती, सोशल मीडियावर वयोमर्यादा निश्चित करण्याची गरज तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात असलेल्या डिजिटल सुरक्षिततेच्या नियमांचाही आढावा घेण्यात येणार आहे. या अभ्यासाच्या आधारे राज्य सरकार भविष्यात कठोर पण आवश्यक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

डिजिटल युगात मुलांना पूर्णपणे तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे शक्य नसले, तरी त्याचा सुरक्षित, मर्यादित आणि सकारात्मक वापर व्हावा, यासाठी ही टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री


ताज्या बातम्या




ताज्या बातम्या