मुंबई : महायुती सरकारने गृहरक्षकांच्या मानधनात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. आधी राज्यातील गृहरक्षकांना प्रतिदिन ५७० रुपयांचे मानधन मिळत होते. आता गृहरक्षकांना प्रतिदिन १०८३ रुपयांचे मानधन मिळेल. गृहरक्षकांना प्रतिदिन मिळणारे हे देशातील सर्वाधिक मानधन आहे. या व्यतिरिक्त राज्यातील गृहरक्षकांच्या विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरुन २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५ हजार गृहरक्षकांना या निर्णयाचा लाभ मिळेल. राज्यातील गृहरक्षकांच्या मानधनात १ ऑक्टोबर २०२४ पासून वाढ लागू करण्यात आली आहे. राज्यात मागच्याच महिन्यात ११ हजार २०७ गृहरक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी गृहरक्षकांच्या मानधनात वाढ केल्याच्या निर्णयाचा शासननिर्णय 'एक्स'वर (आधीचे ट्विटर) पोस्ट केला आहे.