मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून घेण्यात येणारी लिपिक पदाची परीक्षा अशा दोन महत्त्वाच्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवांना भेटून सदरील महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात संबंधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव व सदस्यांची भेट घेतली व सदरील परीक्षा पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली. मागणी अनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
याबद्दल बोलताना अभाविप कोकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, "सदरील परीक्षा पुढे ढकलण्याच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे अभाविप स्वागत करते व आगामी काळात होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी खात्याची २५८ पदे समाविष्ट करून त्वरित परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात याव्या अशी मागणी आयोगाकडे करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुढे करून राज्यात आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम काही राजकीय पदाधिकारी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा अनेक दिवसापासून असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राज्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे या राजकीय लोकांच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. विधायक मार्गाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील विद्यार्थी लढत राहतील" असे फळदेसाई म्हणाले.