नांदेड : महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडच्या प्रचारसभेत म्हणाले. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद हवे असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेतली कमतरता विधानसभेत भरून काढा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रचारसभेत बोलताना मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. महायुतीने शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील नागरिकांना भरीव मदत दिली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर भरीव मदत यापुढेही सुरू राहणार असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.
महायुतीने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली. दळणवळण क्षेत्रात प्रगती केली. मराठवाड्यात शौचालय, वीज, गॅस, पाणी पोहोचवले. महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलली. प्रगतीसाठी कामं केली; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. महायुती सत्तेत पुन्हा आली तर मराठवाड्यासह महाराष्ट्राची वेगाने प्रगती होईल अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.