सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली. ते सातारा येथे सैनिक शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्यात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांना मुख्य प्रवाहात आणि अर्थकारण तसेच राजकारणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने महिलाकेंद्रित योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. एसटीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तोट्यातले एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.